नवी दिल्ली – केंद्र सरकारने मोफत लसीकरणाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे घेतला का, या मुद्द्यावरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अशात केरळमधील एका बालिकेने अनेकांचे जीव वाचवण्यास कारणीभूत ठरणारा हस्तक्षेप केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे मन:पूर्वक आभार मानले आहेत.
इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या लिडविना जोसेफ या अवघ्या दहा वर्षीय बालिकेने सरन्यायाधीश एन.व्ही.रामण्णा यांना एक पत्र पाठवले. त्यामध्ये तिने करोना संसर्गामुळे होणाऱ्या जीवितहानीबद्दल चिंता व्यक्त केली. त्याचवेळी सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या प्रभावी हस्तक्षेपाची बातमी वाचून अभिमान वाटल्याचेही तिने नमूद केले.
पत्रासमवेत तिने स्वत: काढलेले चित्रही जोडले. त्या चित्रात न्यायाधीश कामकाज करताना दिसतात. सरन्यायाधीशांना लिडविनाने पाठवलेले पत्र आणि चित्र भावले. तशी भावना व्यक्त करणारे पत्र सरन्यायाधीशांनी लिडविनाला पाठवले. मोठी होऊन तू सजग, जबाबदार नागरिक बनून राष्ट्रउभारणीत योगदान देशील, अशा सदिच्छाही सरन्यायाधीशांनी व्यक्त केल्या. त्याशिवाय, तिला भेट म्हणून भारतीय राज्यघटनेची प्रतही पाठवली.