सेऊल, (दक्षिण कोरिया) : उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा नेते किम जोंग उन यांच्या प्रकृतीबाबत उत्तर कोरियामधून कोणतेही अधिकृत स्पष्टिकरण अद्याप दिले गेलेले नाही. मात्र किम यांची प्रकृती गंभीर असावी असे उत्तर कोरियाबाहेरील प्रसार माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
या वृत्तामुळे किम यांच्या प्रकृतीस्वास्थ्याबाबत खूपच वेगवेगळे अंदाज वर्तवले जाऊ लागले आहेत. गेल्या सात दशकांपर्यंत एकाच कुटुंबाच्या अधिपत्याखाली असलेल्या उत्तर कोरियाला किम यांच्या पश्चात कोण वारसदार आहे याविषयी पुन्हा चिंता केली जात आहे.
किम यांचे आजोबा आणि उत्तर कोरियाचे संस्थापक किम इल सुंग यांच्या 100 व्या वाढदिवसानिमित्त 15 एप्रिल रोजी झालेल्या समारंभाला किम अनुपस्थित राहिले होते. तेंव्हापासूनच त्यांच्या आरोग्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित व्हायला लागले होते. हा उत्तर कोरियातील सर्वात महत्वाचा समारंभ आहे.
2011 च्या उत्तरार्धात 36 वर्षीय किम यांनी वडिलांकडून सत्ता हाती घेतली. तेंव्हापासून कधीही ते या समारंभाला अनुपस्थित राहिलेले नाही. उत्तर कोरियाच्या सरकारी माध्यमाने आज किरकोळ कार्यक्रमांबाबत किम यांच्या पूर्वीच्या वक्तव्यांना प्रसिद्धी दिली.मात्र त्यात नवीन काहीही नव्हते. उत्तर कोरियात काहीही अस्वाभाविक घडले नसल्याचे दक्षिण कोरियानेही म्हटले आहे.