भोर -भोर शहरात किराणा माल, औषधे, भाजीपाला खरेदी आणि बॅंकेतून पैसे काढण्याच्या नांवाखाली सर्वत्र लॉकडाऊन आणि संचारबंदी असतानाही काही लोक मोठी गर्दी करून सरकारच्या आदेशाला मूठमाती देत असून, करोनासारख्या महाभयंकर रोगाचा फैलाव करण्याची शक्यता निर्माण होत असल्याने भोरच्या महसूल, पोलीस आणि नगरपालिका प्रशासनाने कठोर निर्णय घेतला असून, भोर शहराला जोडणारे चारही प्रमुख मार्ग सील करण्यात आले आहेत.
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भोर शहरात येणारे चारही मार्ग म्हणजे राणी लक्ष्मीबाई पूल, रामबाग पूल, शेटेवाडी चौपाटी व महाडनाका हे चारही मार्ग आडथळे उभे करून बंद करण्यात आले.
असल्याचे भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार अजित पाटील, मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार थोरात आणि भोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजू मोरे यांनी दिली.
भोर पोलिसांनी आंबवडे खोऱ्यातील पान्हवळ गावचे हद्दीत चारचाकी वाहनात बसून व तोंडाला मास्क न लावता फिरणाऱ्या तीन तरुणांवर रविवारी (दि. 5) गुन्हा दाखल केला होता. न्यालयाने या तिघांना प्रत्येकी 1 हजार रुपयांचा दंड ठोठावला असतानाही मंगळवारी (दि. 7) सरकारच्या संचारबंदीचा भंग करून भोर शहरात टोळभैरवांनी मोठी गर्दी केली होती.
ग्रामीण भागातील काही गावांत क्रिकेटचा खेळ खेळून गर्दी केली जात असल्याच्या तर काही तरुण नदीवर एकत्र जमून पोहण्याचा आनंद लुटत असल्याच्या तक्रारी भोर पोलिसांकडे आल्याने पोलिसांनी त्यांना दांडक्याचा प्रसादही दिला आहे.
आजाराचे गांभीर्य लोकांमध्ये नाही
करोनासारख्या महाभयंकर आजाराची नागरिकांना भीती वाटत नसून, त्यामुळे करोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने अखेर भोर प्रशासनाने भोर शहरात प्रवेश बंदी घातली असून, आता पोलीस प्रशासन चांगलेच जागरूक झाले असून त्यांनी या साऱ्या टोळभैरवांना लाठीचा प्रसाद देण्यास सुरुवात केली असल्याने गर्दी करणाऱ्या टोळभैरावांचे धाबे दणाणले आहे.
लॉकडाऊनच्या काळात संचारबंदी असतानाही सरकारच्या आदेशाचे काही टोळभैरव उल्लंघन करून पोलिसांनाही दाद देत नाहीत. त्यामुळे आता भोर शहरात दुचाकी, चारचाकी वाहनांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून, जर कोणी अशा स्थितीतही प्रवेश केला तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
– राजू मोरे, पोलीस निरीक्षक, भोर