वॉशिंग्टन – परग्रहवासीय आहेत का आणि असतील तर ते कुठे असतील याबाबतचे संशोधन सातत्याने सुरू असतानाच आता अवकाश संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्या काही शास्त्रज्ञांनी एका एलियन ग्रहाचा शोध लावल्याचा दावा केला आहे. हा ग्रह आपल्याच आकाशगंगेत असून सूर्यापासून तब्बल अडीचशे कोटी किलोमीटर दूर आहे.
आपल्या सूर्यमंडळातील गुरु या ग्रहापेक्षाही हा ग्रह मोठा असून विश्वात कोठे एलियन असतील तर ते याच ग्रहावर वास्तव्य करत असावेत अशी शक्यता व्यक्त होत आहे. गाईया स्पेस क्राफ्ट या अवकाश यानाने या ग्रहाचा शोध लावला असून या ग्रहाला तात्पुरते एचआयपी 9970 असे नाव देण्यात आले आहे. गाईया स्पेसक्राफ्ट ने जी माहिती जमा केली त्याचे विश्लेषण अवकाश संशोधक थायने कुरी करत आहेत.
सुभारू नावाच्या शक्तिशाली दुर्बिणीचा वापर करून थायने क्यूरी यांनी ह्या माहितीची चाचपणी केली. आकाशगंगेतील आपल्या सूर्य मंडळाच्या बाहेर जर कोणते ग्रह असतील तर त्यांचा शोध घेणे अतिशय अवघड असते. पण आता शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या नव्या तंत्रज्ञानामुळे आपल्या सूर्य मंडळाच्या बाहेरील ग्रहांचा शोध घेणेही शक्य होणार आहे याच तंत्रज्ञानाचा वापर करून ह्या महाकाय ग्रहाचा शोध लावण्यात आला आहे.