- दहा महिन्यांनंतर नागरिकांना प्रवेश
पिंपरी – समाजाचा शास्त्रीय दृष्टिकोन विकसित व्हावा, याकरिता पिंपरी-चिंचवड महापालिकेने उभारलेले सायन्स पार्क आता लॉकडाऊननंतर दहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधीनंतर नागरिकांसाठी पुन्हा शनिवारपासून (दि. 30) नियमितपणे खुले होणार आहे. अनलॉक पाच अंतर्गत सायन्स पार्क खुले करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र कोविड प्रतिबंधात्मक नियमावलीचे पालन करत, नागरिकांना सायन्सपार्कमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.
देशभरात करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने 23 मार्चपासून देश लॉकडाऊन करण्यात आला होता. मात्र, त्यापूर्वीच सायन्स पार्क 115 मार्च 2020 पासून नागरिकांसाठी बंद करण्यात आले होते. त्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरात करोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने सापडू लागले होते. त्यानंतर आर्थिकचक्राला गती देण्यासाठी राज्य सरकारने सप्टेंबर महिन्यात 30 टक्के मनुष्यबळावर तर ऑक्टोबर महिन्यात 100 टक्के मनुष्यबळावर उद्योगनगरीतील कंपन्यांना उत्पादन सुरू करण्यास परवानगी दिली.
दरम्यान, राज्यातील सर्वच शाळा, महाविद्यालये बंद असल्याने सायन्स पार्कदेखील नागरिकांसाठी बंद ठेवण्यात आले होते. मात्र, सरकारने काही अटींचे बंधन घालत अनलॉक पाच अंतर्गत जारी केलेल्या सूचनांमध्ये पर्यटन, शैक्षणिक, धार्मिकस्थळे व संग्रहालये सुरु करण्याचे धोरण अवलंबिले आहे. याआधारे या नियम व अटींना अधिन राहत सायन्सपार्क शनिवारपासून पुन्हा नागरिकांच्या सेवेत रुजू होत आहे.
विज्ञानाभिमुख समाज घडविण्यासाठी शास्त्रीय दृष्टिकोन विकसित करण्यासाठी सायन्स पार्कची निर्मिती करण्यात आली आहे. यामधील प्रदर्शनात विज्ञानावर आधारित प्रयोगांची मांडणी करण्यात आलेली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या शाळांच्या विद्यार्थ्यांनी भेट दिली आहे. आता दहा महिन्यांच्या कालावधीनंतर सायन्सपार्कमध्ये पुन्हा विद्यार्थी व नागरिकांची वर्दळ वाढणार आहे.
सायन्स पार्कमधील प्रवेशाचे निकष
– दहा वर्षांखालील बालके व ज्येष्ठ नागरिकांना प्रवेश नाही.
– प्रवेश करताना मास्क घालणे बंधकारक
– प्रदर्शन पाहताना दोन नागरिकांमध्ये योग्य अंतर असणे आवश्यक