– मेघश्री दळवी
कधी कधी मनातले विचार मोठ्याने बोलून पाहिले तर त्यात एक स्पष्टपणा येतो. त्यातल्या त्रुटी लक्षात येतात. विचार अशा प्रकारे मांडले तर
चर्चेत पारदर्शकता येते. एकमेकांचे दृष्टिकोन समजून घेता येतात. आपण माणसं हा मार्ग अनेकदा वापरतो. रोबॉट्सनाही अशी क्षमता मिळाली, तर त्यांच्याबरोबर संवाद साधणं सोपे जाईल या दृष्टीने आता प्रयोग सुरू झाले आहेत.
पेपर नावाचा ह्युमनॉइड रोबॉट प्रसिद्ध आहे. साधारण माणसासारखा दिसणारा सॉफ्टबॅंक रोबॉटिक्सचा पेपर रोबॉट बॅंका, दुकानं अशा अनेक ठिकाणी ग्राहकांशी संवाद साधताना दिसतो. माणसांना ओळखून, त्यांच्या चेहऱ्यावरील भावना समजून, त्यांच्याशी शक्य तितक्या नैसर्गिकपणे बोलणाऱ्या पेपरला जगातला पहिला सोशल रोबॉट समजतात.
अलीकडे करोना महासाथीच्या काळात ह्युमनॉइड रोबॉट्स अनेक ठिकाणी मदतीला आले. त्यामुळे माणसात सहज मिसळणारे असे सोशल रोबॉट्स उद्या जागोजागी दिसू लागतील या विचाराला बळकटी आली आहे.
गेल्या सहा-सात वर्षांमध्ये पेपरमध्ये काय आणखी नवनव्या क्षमता देता येतील यावर अनेक वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत. त्यातून पेपरची बोलायची पद्धत खूपच सुधारली. यूट्यूबवर पेपर बोलतानाचे व्हिडिओ उपलब्ध आहेत.
त्यातलं पुढचं पाऊल म्हणजे पेपर स्वत:शीच बोलेल, स्वत:ची विचारप्रक्रिया त्यातून तपासून पाहील आणि त्याच वेळी सोबतच्या माणसांशी आपले विचार मोकळेपणे शेअर करील ही संकल्पना. एका इटालियन संशोधक टीमने त्यासाठी खास प्रोग्राम करून पेपरला तयार केलं.
या प्रोग्राममुळे पेपरची कामगिरी सुधारली, त्याच्या निर्णयप्रक्रियेत सुस्पष्टता आली असं या टीमने नुकत्याच प्रकाशित केलेल्या संशोधन अहवालात नमूद केलं आहे. एका चाचणीत पेपर जेवणाचं टेबल मांडत होता. त्यावेळी नॅपकिन चुकीच्या जागी ठेवण्याची सूचना एका संशोधकाने केली. ते ऐकल्यावर पेपरने स्वत:लाच अनेक प्रश्न विचारले.
नॅपकिन इथे ठेवला तर काय होईल, तिथे ठेवला तर काय होईल, मी मला वापरणाऱ्या माणसाचं ऐकलं तर काय होईल, ऐकलं नाही तर काय होईल आणि मग शेवटी माणसाने सुचवलेल्या जागी नॅपकिन ठेवला. आपला निर्णय पारखून पाहण्याच्या या पद्धतीमुळे त्याची कार्यक्षमता वाढली आणि माणसांच्या सूचना योग्य त्या वेळी पाळून त्याने आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडली.
पेपरला असं स्वगत बोलताना पाहून त्याच्या आजूबाजूची माणसं मात्र गोंधळून गेली. ही गोष्ट त्यांच्यासाठी नवी होती, आश्चर्याची होती, किंचित धक्कादायकही होती. पण एकदा लक्षात आल्यावर ते आश्वस्त झाले.
रोबॉट्सचा विचार कसा चालतो याचा प्रत्यय आला तर माणसं रोबॉट्सवर जास्त विश्वास टाकतील अशी यामागची कल्पना या संशोधकांनी बोलून दाखवली आहे.
अर्थात रोबॉट्सना काय ठाऊक की माणसं बोलतात एक आणि त्यांच्या मनात असतं दुसरंच! रोबॉट्स मात्र बिचारे डोक्यातलं सगळं जसंच्या तसं बोलून टाकतील!