डॉ. मेघश्री दळवी
अठ्ठेचाळीस वर्षांपूर्वी अरेसीबो रेडिओ दुर्बीणीतून एक खास संदेश अवकाशात प्रसारित करण्यात आला होता. मेटी म्हणजे मेसेज एक्स्ट्राटेरेस्ट्रिअल इंटेलिजन्स या योजनेतला हा संदेश एलियन्ससाठी होता. या अफाट अवकाशात जिथे कुठे एलियन्स असतील, तिथे त्यांना आपली माहिती पोचवावी असा हेतू त्यामागे होता.
सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ फ्रॅंक ड्रेक आणि कार्ल सेगन यांच्या कल्पनेतून साकार झालेल्या या संदेशात आपल्या तांत्रिक प्रगतीची माहिती दिलेली होती. गेल्या अठ्ठेचाळीस वर्षांत हा संदेश किती एलियन्सना पोहोचला आपल्याला माहीत नाही. आपल्याला कोणा एलियन्सकडून उत्तरही मिळालेलं नाही. पण संशोधकांना अजूनही आशा आहे. अवकाशातली अवाढव्य अंतरं पाहता अठ्ठेचाळीस वर्षांत हा संदेश फारसा दूर गेला नाही आणि आपल्याला दीर्घकाळ वाट पाहावी लागेल, असा विश्वास काही शास्त्रज्ञांना आहे. तर आणखी काही शास्त्रज्ञांना संशय आहे की, एलियन्सनी मुद्दामच आपल्याला उत्तर दिलेले नाही. त्यामागे चार-पाच वेगवेगळी कारणं त्यांना वाटतात. आपण संदेश पाठवून विनाकारण आपल्यावर संकट ओढवून घेत आहोत अशी काही जणांची धारणा आहे, तर एकूणच हा खटाटोप नक्की कशासाठी अशी इतरांची भूमिका आहे.
अशी वेगवेगळी मतं असली तरी अवकाशात कोणीतरी आहे आणि त्याला आपला संदेश पोहोचला ही कल्पनाच अद्भुत आहे. त्यामुळे मेटी संदेश पाठवणं बहुधा यापुढेही सुरू राहील. असा पहिला संदेश पायोनियर 10 यानातल्या सोनेरी तबकडीवर कोरला होता. हे यान आता आपल्यापासून अठरा अब्ज किलोमीटर पलीकडे गेलेलं असून लवकरच सूर्यमालेच्या बाहेर जाईल. दुसरा संदेश पायोनियर 11 यानातल्या अशाच तबकडीवरून 1973 मध्ये पाठवलेला आहे. हे यान पंधरा अब्ज किलोमीटरहून दूर आहे. व्हॉयेजर 1 आणि 2 या 1977 मध्ये अवकाशात झेपावलेल्या यानांमध्येही अशाच तबकड्या आहेत. त्यांच्यात चित्र आणि ध्वनीचाही अंतर्भाव आहे. ही दोन्ही यानं आता सूर्यमालेपलीकडे गेलेली आहेत.
गेल्या वीस वर्षांमध्ये अनेक वेगवेगळे संदेश पाठवल्याची नोंद आहे. उत्तर अर्थात अजून आलेलं नाही. तरीही आपल्या बाजूने नवीन संदेश तयार करून पाठवण्याचे प्रयत्न थांबलेले नाहीत. गेल्या महिन्यात नासाच्या जेट प्रॉपल्शन लॅबमधल्या संशोधकांनी एलियन्ससाठी पुन्हा एकदा एक नवा संदेश तयार केला आहे. आजवरचे सगळे संदेश एकत्र करून त्यांनी हा नवा संदेश रचला आहे. अरेसीबो संदेशाचा सुवर्ण महोत्सव जवळ येत आहे. त्यासाठी म्हणून आणि एलियन्सशी संपर्क करण्याचे प्रयत्न सुरू राहावेत यासाठी ही तयारी आहे. बीकन इन द गॅलक्सी असं या तेरा पानी संदेशाचं नामकरण करण्यात आलं आहे. त्यात आपल्या ग्रहाचा पत्ता अचूकपणे दिलेला आहे. बीकन हा खुणेसाठी उभारत असल्यामुळे या खुणेवरून कोणी एलियन आपल्याला भेट देतो का हे आता पाहायचं.