विज्ञानविश्‍व : मोनार्क धोक्‍यात

डॉ. मेघश्री दळवी

ग्लोबल वॉर्मिंगचे धोके एक एक करून पुढे येत आहेत. बदलतं हवामान, वितळते हिमनग, समुद्राची पातळी वाढून अनेक शहरं पाण्याखाली जाण्याचं संकट अशा अनेक दिशांनी आपल्याला समस्या उभ्या राहताना दिसत आहेत. त्यात भर पडत आहे ती एकंदरीत परिसंस्था (इकोसिस्टम) ढासळण्याची.

मधमाशी आणि फुलपाखरं हे दोन छोटे जीव; पण आपल्या परिसंस्थेत त्यांना अत्यंत मोलाचं स्थान आहे. रोपांचं परागण करण्यात हे दोघेही अतिशय महत्त्वाची कामगिरी बजावतात. मात्र, आता मोनार्क जातीच्या फुलपाखरांचं अस्तित्वच धोक्‍यात येत आहे आणि त्याला कारण आहे – पुन्हा एकदा तेच, हवामानातले विचित्र बदल. मोनार्क फुलपाखरं मुख्यत: उत्तर अमेरिकेत आढळतात. प्रशस्त पसरलेली माळरानं, हिरव्यागार गवतात उगवणारी रंगीबेरंगी फुलं असं प्रसन्न वातावरण असलं की, तिथे मोनार्क फुलपाखरं हमखास असणारच! मोनार्क अंडी घालतात ती मिल्कवीड या पांढरट चिक येणाऱ्या रोपट्यावर. कारण अंड्यातून अळ्या बाहेर आल्या की त्यांना लगोलग मिल्कवीडची पानं हे अन्न मिळते. फक्‍त याच रोपट्याची पानं खाऊन या अळ्या वाढतात. चांगल्या धष्टपुष्ट झाल्या की, त्या कोश तयार करतात आणि मग कोशातून बाहेर येते फुलपाखरू. ही मोनार्क फुलपाखरे बऱ्याच रानटी झाडाझुडुपांचे परागण करतात.

अलीकडे वातावरणातल्या वाढत्या कार्बन डायऑक्‍साइडमुळे हे मिल्कवीड रोपटं तग धरू शकत नाहीय. तापमानातली थोडीशी वाढदेखील त्यांना सहन होत नाही. त्यामुळे उन्हाळा आला की भरभरून वाढणारी ही रोपटं आणि त्यांच्या आधाराने आपले जीवन फुलवणारी मोनार्क, हे दृश्‍य कमी होत चाललं आहे. भर उन्हाळ्यात मिल्कवीड रोपटी माना टाकतात आणि पुन्हा उभी राहू शकत नाहीत. त्यामुळे अनेक मोनार्क फुलपाखरांचा अळी ते फुलपाखरू हा जीवनक्रम अपूर्ण राहतो.
एकीकडे वाढतं तापमान ही समस्या आहे तर दुसरीकडे अवकाळी पावसाने मिल्कवीड मरताना आढळली आहेत. कधी वातावरणात अचानक गारवा आला की ही नाजूक रोपटी आणि फुलपाखरं टिकत नाहीत. हिवाळ्यात खरे तर मोनार्क मोठ्या प्रमाणात दक्षिणेकडे स्थलांतर करतात. पण मेक्‍सिको किंवा अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्ये ही त्यांची हक्‍काची ठिकाणे अलीकडे फार उष्ण होत चालली आहेत. त्यात तिथे मोकळ्या जागा आणि हिरवाई कमी होते आहे. त्यामुळे मोनार्क चहूबाजूंनी त्रासून गेलेले आहे.

ग्लोबल वॉर्मिंग एवढाच माणसाचा हस्तक्षेप मोनार्कच्या मुळावर आलेला नाही. आपल्या हातून इतर अनेक प्रकारे मोनार्कना धोका उद्‌भवतो आहे. मोठ्या प्रमाणावर पीक घेताना उत्तर अमेरिकेत यंत्रांचा आणि तणनाशकांचा सढळ हस्ते वापर होतो. त्यात अनेक वेळा मिल्कवीडचाही बळी जातो आणि पर्यायाने मोनार्कना उपलब्ध असलेलं अन्न घटतं. शेतीखाली किंवा औद्योगिक विकासासाठी अधिकाधिक जमीन जात असताना मोनार्कना पुरेशी मोकळी जागा मिळत नाहीत. हवेतील प्रदूषणामुळेही या नाजूक जीवांची हानी होते. आता मोनार्क फुलपाखरांच्या संवर्धनासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यात सरकार, पर्यावरणाविषयी जागरूक असलेल्या संस्था यांच्या जोडीने सामान्य माणसंही जाणीवपूर्वक भाग घेत आहेत, हे विशेष.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.