मताचा वाढलेला टक्का कुणाच्या पारड्यात?

फोडाफोडीच्या राजकारणाने मतदार संघातील समीकरण बदलणार; 23 मेची उत्कंठा 
धनंजय घोडके

वाई – देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी यांच्या प्रतिष्ठेची तर महाराष्ट्रात शरद पवार, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय भवितव्य अधोरेखित करणारी 2019 ची लोकसभा निवडणूक चालू असून बारामती, म्हाडा व सातारा या राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मतदार संघातील मतदान 23 एप्रिल रोजी पार पडले. गतवेळेस या तीनही मतदार संघात राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आल्याने पर्यायाने शरद पवार यांचे पारडे जड झाले. त्यांच्यापुढे विरोधक हतबल झाले होते.

त्यातच कोल्हापूर मतदार संघातही राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आल्याने कोल्हापूरपासून बारामतीपर्यंत संपूर्ण उसाचा पट्टा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जावू लागला. परंतु, गेल्या पाच वर्षात पुलाखालून बरेच पाणी गेल्याने तसेच देशात भाजपचे सरकार असल्याने महराष्ट्रातील साखर पट्ट्यात भाजपने आपले हात पाय मारायला सुरुवात करून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व मान्य करून अनेकांनी भाजपात प्रवेश केला. त्यामुळे एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्या साखर पट्ट्यात भाजपने आपली पकड मजबूत करीत जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगरपालिकामध्ये आपले उमेदवार निवडून आणून सातारा लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी नंतर भाजप दोन नंबरचा पक्ष मानला जावू लागला. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत नऊ उमेदवार रिंगणात असले तरीही खरी टक्कर ही शिवसेना-भाजपा-आरपीआय-रासप यांच्या महायुतीचे नरेंद्र पाटील व कॉंग्रेस-राष्ट्रवादी व मित्रपक्ष यांच्या महाआघाडीचे श्री. छ. खा. उदयनराजे भोसले यांच्यातच पहायला मिळणार आहे. गतवेळेस सातारा लोकसभा मतदार संघात 58 टक्के मतदान झाले होते. त्यावेळी महाराजांना तीन लाख पन्नास हजारांचे लीड मिळाले होते. विरोधक मजबूत नसल्याने एकाकी लढत पाहावयास मिळाली.

2014 च्या निवडणुकीत थेट छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून अनेक पक्षातील लोकांनी महाराजांना उघड-उघड मदत केली होती, त्यातील उत्तर कराड मधून अतुल भोसले, मनोज घोरपडे, विलास उंडाळकर, माण खटावमधून दिलीप येळगावकर, शेखर गोरे, जयकुमार गोरे, वाईमधून माजी आमदार मदन भोसले, महाबळेश्‍वरमधून डी. एम. बावळेकर, शिरवळ मधून पुरुषोत्तम जाधव, हे सर्वजण 2019 च्या निवडणुकीत भाजपबरोबर असल्याने महराजांची लढत एकाकी दिसून आली. त्यातच मताचा टक्का वाढल्याने त्याचा फायदा कोणाला होणार? दोन्ही उमेदवार त्यावर आपला हक्क सांगत असले तरीही राजकीय तज्ञांच्या मते याचा फायदा महायुतीलाच होणार असे बोलले जात आहे.

आजवर मतांचा वाढलेला टक्का प्रस्थापितांना फटका देणाराच ठरला आहे. माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांना कोण ओळखतंय असा दावा राष्ट्रवादी करीत असली तरीही गेल्या पाच वर्षात भाजपने सातारा लोकसभा मतदार संघात केलेली उलथापालत यामुळे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचणे सहज शक्‍य झाले. यामध्ये सोशल मीडियाचा सिंहाचा वाटा आहे. उलट महराजांच्या गोटात असणाऱ्या राष्ट्रवादी-कॉंग्रेस व मित्रपक्षांच्यात एकोपा दिसून न आल्याने महाराज प्रेमींना चांगलीच पायपीट करावी लागली, संपूर्ण कुटुंब पायाला भिंगरी बांधून प्रचार करताना दिसत होते. राष्ट्रवादीचे सहाही आमदार जोरात प्रचार करताना दिसले. परंतु कार्यकर्त्यांची त्यांना हवी तशी साथ मिळाली नाही.

कॉंग्रेसने सवता सुभा मांडला असल्याने त्यांनी कितीही जोमाने प्रचार केला तरीही त्यांचेच अस्तित्व शोधण्याची वेळ त्यांच्यावर असल्याने त्यांचा प्रभाव दिसू शकला नाही. उमेदवार राष्ट्रवादीचा असल्याने फक्त राष्ट्रवादीच झाडून प्रचारात उतरलेली होती. अपक्ष किंवा इतर पक्ष आपला प्रभाव मतदारांवर पाडू शकले नाहीत. राष्ट्रवादीचे शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील यांच्या सभांना गर्दी प्रचंड दिसून आली तर पृथ्वीराज चव्हाण व इतर नेत्यांच्या सभेला मतदारांनी पाठ फिरविली. दरम्यान महायुतीच्या दिग्गज नेत्यांच्या सभेला गर्दी चांगली झाली. सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीची पक्कड मजबूत असल्याने काटे की टक्कर पहायला मिळणार. परंतु वाढलेला टक्का कोणाच्या पारड्यात पडणार त्यावर दोन्ही उमेदवारांचा विजय निश्‍चित होणार आहे, त्यासाठी येणाऱ्या 23 मेची वाट पाहावी लागणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.