लोणंद – खंडाळा तालुक्यातील वाठार काॅलनी येथील हायस्कूलची मुलं शाळेत घेऊन जात असलेल्या स्कूल व्हॅनने अचानक पेट घेतल्याची घटना लोणंद-शिरवळ रस्त्यावरील शेडगेवाडी फाट्याजवळ शनिवारी सकाळी आठच्या सुमारास घडली. ही स्कूल व्हॅन गॅसवर चालवली जात असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
या व्हॅनमध्ये शेडगेवाडी येथील आठ ते दहा विद्यार्थी होते. व्हॅनने अचानक पेट घेतल्यावर प्रसंगावधान राखून चालकाने सर्व मुलांना सुखरूप बाहेर काढले. मात्र, या आगीत स्कूल व्हॅन संपूर्ण जळून खाक झाली आहे.
या स्कूल व्हॅनचा चालक हा वाठार काॅलनी येथील हायस्कूलचाच शिपाई असल्याचे समजते. या अपघाताने स्कूल व्हॅनच्या आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.