प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 4 -शाळेतील कामकाजाचे नियंत्रण करण्यासाठी शाळा समिती व्यवस्थापन समितीची महत्त्वपूर्ण भूमिका असते. शिक्षणाच्या विकासात लोकसहभाग राहावा, या दृष्टीने जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांने शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षण विभागाने दिले आहेत. त्याचे वेळापत्रकही जिल्हा परिषदेने जाहीर केले असून, त्यानुसार कार्यवाही करणे शाळांना अनिवार्य राहणार आहे.
शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रत्येक शाळेत नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याच्या तारखेपासून तीन महिन्यांच्या शाळा व्यवस्थापन समिती गठित करणे व ती प्रत्येक दोन वर्षांनी पुन्हा समिती गठित करण्यात येईल, अशी तरतूद आहे. त्यानुसार यंदाच्या शैक्षणिक वर्षात ज्या शाळा व्यवस्थापन समितीची मुदत संपली आहे. त्यांनी ही समितीची फेररचना करणे आवश्यक आहे. शंभर टक्के पात्र शाळांच्या शाळा व्यवस्थापन समितीचे गठण दि. 5 ते 30 सप्टेंबर या कालावधीत करावे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
प्रत्येक शाळेसाठी ग्राम शिक्षण समिती, वार्ड शिक्षण समिती अथवा खासगी शाळांच्या बाबतीत शाळा समिती गठित करण्यात येते. या समित्या शाळांच्या भौतिक व शैक्षणिक विकासाच्या बाबतीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. या समिती स्थापन करण्याच्या प्रक्रियेत निरीक्षक म्हणून तालुक्यातील केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, गटशिक्षणाधिकारी यांनी उपस्थित राहून समिती निवडणूक संदर्भात कामकाज पार पडण्याची कार्यवाही करावी, असे आदेशात म्हटले आहे.
समिती स्थापन करण्यासाठी वेळापत्रक
दि. 5 ते 10 सप्टेंबर दरम्यान स्थानिक प्राधिकरणाचे निवडून आलेले एक प्रतिनिधी, शाळेच्या शिक्षकांमधून शिक्षकांनी निवडलेले एक शिक्षक, विद्यार्थी प्रतिनिधी 2 सदस्य निवड करावयाची आहे. दि. 5 सप्टेंबर रोजी पालक सभा घेण्यात यावी. या सभेत पालकांनी निवडलेले शिक्षणतज्ज्ञ, बालविकास तज्ज्ञांची नियुक्ती 13 ते 25 सप्टेंबर या दरम्यान करावी. याच कालावधीत पालक सदस्यांची निवड करावेत. पालक सदस्यांतून समिती अध्यक्ष व उपाध्यक्षाची निवड करावी, असेही नमूद करण्यात आले आहे.