तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – नगर परिषदेकडून दरवर्षी शहराच्या विविध भागातील ओढे-नाल्यांची पावसाळ्यापूर्वी साफसफाई केली जाते. सध्या ही कामे अंतिम टप्प्यात असून ९० टक्क्यांहून अधिकची कामे पूर्ण झाल्याची माहिती आरोग्य विभागाचे प्रमुख अभिषेक शिंदे यांनी दिली. तळेगाव नगर परिषदेकडून मे महिन्यापासूनच ओढे-नाले यांतील जलपर्णी, प्लॅस्टिक कचरा, गाळ, माती सफाईची कामे सुरू होत असतात.
तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन मागील ओढा, डोळसनाथ मंदिराच्या जवळील ओढा, मुस्लिम दफन भूमी, घोरावाडी रेल्वे स्टेशन जवळील ओढा तसेच शहरातील अन्य भागातील ओढ्यांची महिनाभर पालिकेच्या आरोग्य विभागाकडून साफसफाई सुरू होती. यात कडोलकर कॉलनी येथील ओढ्याचे काम सुरु आहे. तर, मोठ्या गटारींच्या सफाईचे काम पूर्ण झाले आहे.
नगर परिषदेचे मुख्याधिकारी एन. के. पाटील, उपमुख्याधिकारी ममता राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाचे प्रमुख अभिषेक शिंदे, स्वच्छता निरीक्षक तुकाराम मोरमारे, मयूर मिसाळ, प्रमोद फुले तसेच रोहित भोसले आदींनी नियोजन करून ९० टक्के कामे पूर्ण करून घेतली आहेत. राहिलेली सफाईची कामे दोन-तीन दिवसांत पूर्ण होतील.
….