पुणे – महाराष्ट्रात वेळेपूर्वी दाखल झालेल्या नैॠत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनची वाटचाल सध्या मंदावली आहे. मान्सूनची फक्त अरबी समुद्रीय शाखाच महाराष्ट्रात पुढे सरकत आहे. तर, बंगालच्या उपसागराची शाखा स्थिरावलेली आहे. त्यामुळे सध्या मान्सून थबकल्याचे चित्र आहे.
मान्सूनच्या वाटचाल आणि प्रगतीबाबत भारतीय हवामानशास्त्र विभागाने शनिवारी माहिती दिली. सध्याच्या भौगोलिक स्थिती पाहता, वाऱ्यांच्या प्रगतीसाठी आणखी चार-पाच दिवस प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे. राज्यात मान्सून जळगाव, अमरावती आणि चंद्रपूरपर्यंत पोचलेला आहे. मान्सूनने बुधवारी राज्यातील काही भागांत प्रगती केली होती. पण, गेल्या दोन दिवसांपासून हे वारे पुढे सरकलेले नाहीत.
दरम्यान, मान्सूनने आतापर्यंत मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र व्यापला आहे. विदर्भ आणि खानदेशचा काही भाग मान्सूनने व्यापायचा बाकी आहे. तेलंगणा, तसेच छत्तीसगडच्या आणि गुजरातच्या काही भागांत मान्सून पोहचलेला आहे. पुढील ४ ते ५ दिवसांमध्ये मान्सून ओडिसा, महाराष्ट्र, छत्तीसगड, किनारी आंध्र प्रदेश आणि बंगालच्या उपसागरात आणखी काही ठिकाणी प्रगती करेल, असा अंदाजही हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.
“पावसाला पूरक ठरणारी मराठवाडा क्षेत्रावरील चक्रीय वाऱ्याची स्थिती निवळली आहे. उंचावरील पूर्व-पश्चिम वाऱ्याचे क्षेत्र मान्सून झेपावण्यासाठी अनुकूल नाही. तसेच हिंद महासागरीय तापमानाची द्वि- ध्रुविता (आयओडी)अनुकूल नाही. मान्सून बळकटीसाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा असेल.” – माणिकराव खुळे, निवृत्त शास्त्रज्ञ, आएमडी पुणे.