उच्च शिक्षणासाठी आठ विद्यार्थ्यांना नव्याने शिष्यवृत्ती मंजूर

आठ विद्यार्थ्यांची नव्याने निवड; सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाचे अवर सचिव अश्‍विनी मगर यांची माहिती

 

पुणे – अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना नामांकित शैक्षणिक शिक्षण संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेता यावे यासाठी राजर्षि शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना लागू केली. यासाठी आठ विद्यार्थ्यांची नव्याने निवड झाली आहे.

समाजकल्याण आयुक्‍तांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने 2019-20 या वर्षासाठी प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी निवड प्रक्रिया राबवून त्याद्वारे प्राप्त अर्जातून एकूण 66 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळवून दिला आहे. उर्वरित विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया करण्यासाठी नव्याने जाहिरात देवून अटी व शर्तीनुसार कार्यपद्धत राबवली.

शिष्यवृत्ती मंजूर झालेल्या विद्यार्थ्यांना त्या त्या शैक्षणिक संस्थेने ठरवून दिलेले पूर्ण शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क समाजकल्याण आयुक्‍तालयाकडून संस्थेला देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक संस्थेने वसतीगृह व भोजन शुल्क त्यांच्या आकारणीप्रमाणे पूर्ण खर्च देण्यात येणार आहे. ही खर्चाची रक्‍कम वर्षभरात एकदाच देण्यात येईल.

अभ्यासक्रमासाठी लागणारी पुस्तके, शैक्षणिक साहित्य त्याचप्रमाणे इतर शैक्षणिक खर्च यासाठी एकूण 10 हजार रुपये प्रत्येक वर्षी देण्यात येणार आहे. अभ्यासक्रमाच्या खर्चाबाबत संबंधित विद्यापीठ, संस्थेकडून माहिती मागवून व विद्यार्थ्यांच्या प्रगती व उपस्थितीबाबतचे प्रमाणपत्र प्राप्त करून घेऊन संबंधितास रक्‍कम अदा करण्यात यावी, असे आदेश सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाचे अवर सचिव अश्‍विनी मगर यांनी दिले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.