अरे मिहीर, हे रे काय? कॅलेंडर का घेऊन आलास? मे महिन्याच्या सुट्टीचे प्लॅनिंग करायचे आहे का?’
“पण हे तर मागच्या वर्षीचे आहे?’
“ए सांग ना काहीतरी. प्रत्येकाला एक एक महिन्याचे पान दिलेस. करायचे तरी काय हे घेऊन?’
“चला भेळेसाठी पुडी करू याची नाहीतर विमाने उडवू.’
“अरे! अरे! थांब. असं काही करू नको.’ मिहीर बोलला कारण त्याच्या न बोलण्याने सगळीच जण वैतागली होती. “बाबांनी प्रत्येकाला एकेका महिन्याचे पान द्यायला सांगितले आहे निरीक्षण करायला.’
“यात वेगळं काय ते? मागचे पूर्ण वर्ष तर पाहत होतोच की.’
“काकांनी निरीक्षण करायला सांगितले आहे ना! मग बघू तरी गणितातील गंमती जमती यात सापडतात का,’ सानवी समजूतदारपणे बोलली.
“माझ्याकडे फेब्रुवारीचे पान आहे. लीप वर्ष असल्याने हा महिना एकोणतीस दिवसांचा होता,’ प्रणवने सांगितले.
अनय कंटाळलेल्या स्वरात बोलला, “त्यात काय? बाकीच्यांच्या कागदावर तीस नाहीतर एकतीस दिवस असतील.’
“आपल्याला संख्यांचे निरीक्षण करायचे आहे. म्हणजे बघा हं! प्रत्येक आडव्या ओळीतील संख्या सात ने वाढत जात आहेत.’ सानवी मनापासून विचार करत होती त्यामुळे सगळीचजण त्यांच्या नकळत हातातील कॅलेंडरच्या पानाचे निरीक्षण करू लागले.
“तिरप्या ओळीतील संख्या आठ ने वाढत जात आहेत.’
“नाही गं तन्वी. त्या तर सहा ने वाढत आहेत ना!’ मिहीर बोलला.
“तुमच्या दोघांचेही बरोबर आहे. कारण जर डावीकडून उजवीकडे खाली जाणाऱ्या तिरप्या रेषेतील संख्या आठ ने वाढत जात आहेत. आणि डावीकडून उजवीकडे वरच्या दिशेने जाणाऱ्या तिरप्या रेषेतील संख्या सहाने वाढत आहेत.’ सानवीने बोलली.
“अरे, प्रत्येक महिन्यांमध्ये ही गंमत आहे का बघा बर. प्रत्येक आडव्या ओळीत आणि उभ्यारांगेत तीन-तीन तारखा असतील असा कोणताही एकूण नऊ तारखांचा चौरस विचारात घ्या.’
“प्रणव तुझ्या काय लक्षात आले?’ मिहीरने विचारले.
“तिरप्या ओळीत तीन संख्या आहेत. त्यातल्या मधल्या संख्येच्या दुप्पटी एवढी उरलेल्या दोन संख्यांची बेरीज येत आहे.’
“प्रणव, अशीच बेरीज मधल्या उभ्या ओळीतील आणि मधल्या आडव्या ओळीतील संख्याच्या बाबतीत सुद्धा आहे.’ अनय एकदम उत्साहात म्हणाला.
“म्हणजे हा तर जादूचा चौरस झाला की!’
“अरे वा! कॅलेंडरमधील चौरसाची पण गंमत शोधलीत का? छान! छान! पण मिहीर हा जादूचा चौरस नव्हे बरं.’ मिहीरचे बाबा बाहेर येत म्हणाले. “जादूचा चौरस? म्हणजे काय?’ अनयने उत्सुकतेने विचारले.
“बाबा, तो ही असाच नऊ संख्यांचा असतो ना?’
“बरोबर मिहीर. पण जादूच्या चौरसातील प्रत्येक आडव्या, उभ्या आणि दोन तिरप्या ओळीत असणाऱ्या संख्यांची बेरीज सारखी असते. आणि ही बेरीज बरोबर मध्ये येणाऱ्या संख्येच्या तिप्पट असते. मग सांगा बरं,कॅलेंडरमधला हा चौरस जादूचा असेल का?’ मिहीरच्या बाबांनी मुलांना विचारले.
“नाही येणार काका. पण जादूच्या चौरसाविषयी अजून काही सांगा ना,’ तन्वी बोलली.
“चौरसातील संख्या जर तुम्ही चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडल्यात तर यामध्ये येणारी मधली संख्या ही चौरसात येणारी बरोबर मधली संख्या असते. आणि सगळ्यात सोपा चौरस तुम्हाला कोणत्याही नऊ क्रमागत येणाऱ्या संख्या घेतल्या तर मिळेल. आता प्रत्येकाने एकेक चौरस शोधून दाखवा बरं.’ मिहीरच्या बाबांनी त्यांचे बोलणे आवरते घेत मुलांना विचार करायला वेळ दिला.
बालमित्रांनो, तुम्ही पण असा जादूचा चौरस शोधणार याची खात्री आहे.
– विशाखा गंधे