पुणे – पीएमपी पास काढताना सुट्टे पैसावरून होणारी कटकट आता कमी होणार. पास केंद्रावरील क्युआर कोड स्कॅन करून पैसे भरा आणि तत्काळ पास मिळविण्याची सुविधा पीएमपी प्रशासनाने आणली आहे. येत्या सोमवार (दि. 23) पासून सर्व बसडेपोत ही सुविधा सुरू होणार आहे.
महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते आणि परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सचिन्द्र प्रताप सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत या सेवेचा शुभारंभ सोमवारी होणार आहे. पीएमपीला पास विक्रीतून सरासरी पाच कोटीचे उत्पन्न मिळते. तर 60 हजार पासची विक्री होते. त्यामध्ये प्रवाशी दैनिक आणि मासिक पास, ज्येष्ठ नागरिक मासिक पास तसेच विद्यार्थ्यांसाठी मासिक, त्रैमासिक, सहामासिक, वार्षिक आणि पंचिंग असे प्रकारचे पास दिले जातात. 40 रुपयांपासून 5 हजार रुपयांपर्यंत मासिक पासची रक्कम आहे.
त्यामुळे विद्यार्थी किंवा नागरिक केंद्रावर पास घेण्यासाठी आल्यावर ऑनलाईन पेमेंट आहे का? अशी विचारणा केली जाते. त्यावेळी पेमेंट सुविधा नसल्यामुळे बहुतांश प्रवाशी कॅश मिळविण्यासाठी एटीएममध्ये जावे लागते आणि मनस्ताप सहन करावा लागतो. तर काहीवेळी पैसे सुट्टे नसल्यामुळे पास केंद्रातील कर्मचारी आणि प्रवाशी यांच्यात शाब्दीक वादही होतात. या सर्व बाबी लक्षात घेऊन आणि प्रवाशांच्या सोयीसाठी आता सर्व 40 पास केंद्रावर ही कॅशलेस सुविधा सुरू करण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला आहे.
“कॅशलेस तिकीट सेवेत प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता पास केंद्रावरही प्रवाशांना क्युआर कोड स्कॅन करून पेमेंट करता येणार आहे. त्यामुळे वेळेची बचत आणि प्रवाशांना होणार त्रास कमी होईल. ” -सचिंद्र प्रताप सिंह अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पीएमपी
असे होणार कॅशलेस पेमेंट
- पास केंद्रावरील सेवकास ऑनलाईन क्युआर कोडची मागणी करणे
- क्युआर कोड स्कॅन करून ऑनलाईन पेमेंट करणे
- पास केंद्रावरील सेवकांकडून पास प्राप्त करणे