पुणे – आशियातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठाच्या क्रमवारीत पारंपरिक विद्यापीठात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने स्थान मिळविले आहे. आशियातील पहिल्या दोनशे उच्च शिक्षणसंस्थांमध्ये मुंबई येथील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था, पुणे (आयसर) या तीन उच्च शिक्षण संस्थांचा समावेश आहे.
टाईम्स उच्च शिक्षणाच्या आशियातील पहिल्या दोनशे विद्यापीठाची क्रमवारी जाहीर केली. पहिल्या शंभर शिक्षण संस्थांमध्ये चीनच्या विद्यापीठांची संख्या सर्वाधिक आहे. चीनमधील सिंगुआ विद्यापीठाने पहिले, पेकिंग विद्यापीठाने दुसरे स्थान मिळवले आहे. तर भारतातील केवळ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (38), आयआयटी रोपार (55) आणि आयआयटी इंदूर (78) या तीनच संस्थांना स्थान मिळाले आहे.
तर, पहिल्या दोनशे उच्च शिक्षण संस्थांमध्ये देशभरातील 18 शिक्षण संस्थांचा समावेश आहे. तसेच, मुंबईची इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (122), आयआयटी गांधीनगर (137), किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी (139), आयसर कोलकाता (142), इंद्रप्रस्थ इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी (143), आयआयटी हैद्राबाद आणि थापर युनिव्हर्सिटी (144), महात्मा गांधी विद्यापीठ (154), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (169), अम्रिता विश्व विद्यापीठ (170), बनारस हिंदू विद्यापीठ (172), पंजाब विद्यापीठ (175), जामिया मिलिया इस्लामिया (180), जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (187) आणि आयसर पुणे (199) या शिक्षणसंस्थांचा क्रम लागतो.