नवी दिल्ली – पुणेस्थित महामार्ग विकसक व रस्ता सुरक्षा तज्ज्ञ सतीश पारेख यांनी “इंटरनॅशनल रोड फेडरेशन इंडिया चॅप्टर’च्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारली आहे. इंटरनॅशनल रोड फेडरेशन ही जिनिव्हा येथील जागतिक रस्ता सुरक्षा संस्था असून, या संस्थेमार्फत जगभरात रस्ता सुरक्षा सुधारणेबाबत कार्य केले जाते.
इंटरनॅशनल रोड फेडरेशनच्या कार्यकारी मंडळामार्फत एकमताने 4 सप्टेंबरला सतीश पारेख यांची निवड करण्यात आली आहे. “सीआरआरआय’चे माजी अध्यक्ष डॉ शुभमय गंगोपाध्याय यांच्याकडून त्यांनी ही सूत्रे स्वीकारली.
सतीश पारेख हे भारतातील मोठ्या हायवे विकसक कंपन्यांपैकी एक असलेल्या “अशोका बिल्डकॉन लिमिटेड’ चे प्रवर्तक तसेच कार्यकारी संचालक आहेत.
“द अशोका रोड सेफ्टी कॅम्पेन’ या नावाने 2014 साली “अशोका बिल्डकॉन’ने त्यांच्या रस्ता सुरक्षा मोहिमेला औपचारिकरित्या सुरुवात केली आहे. दरवर्षी जानेवारी महिन्यात राबविल्या जाणाऱ्या या मोहिमेत शाळा-कॉलेजांमध्ये रस्ता सुरक्षेचे धडे देणे, ट्रक, बस चालकांशी संवाद साधणे, मोफत डोळे व आरोग्य तपासणी शिबिरे भरविणे, नागरिकांमध्ये जनजागृती, रस्ता सुरक्षेबद्दलच्या माहितीपत्रकांचे वितरण यासारख्या उपक्रमांचा समावेश असतो.