वाई – बँकिंग व्यवसाय करतच दि वाई अर्बन बँकेने आकर्षक दिनदर्शिका छपाई करून ग्राहकांची नेमकी गरज ओळखली आहे. बँकेचा हा उपक्रम स्तुत्य आहे, असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी व्यक्त केले.
बँकेच्या सभागृहात प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी बँकेचे अध्यक्ष अनिल देव यांच्या व मान्यवर संचालक सदस्यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली. सर्वच आर्थिक संस्थांपुढे थकीत कर्ज वसुलीची समस्या वाढली आहे. समाजात आर्थिक फसवणूक करणा-या लोकांची संख्या वाढत असून अर्थसंस्थांनी कर्जपुरवठा करताना दक्षता घ्यावी. वाई अर्बन बँकेने सर्व अडचणींवर मात करीत चांगल्या पध्दतीने कारभार सुरू ठेवल्याबद्दल श्री. भरणे यांनी संचालक मंडळाच्या कामाची प्रशंसा केली. काही वेळा नकळत चुकीच्या कार्यपध्दतीमुळे अडचणी निर्माण होतात. अशा वेळी सनदशीर मार्गाने अशा अडचणी सोडवाव्या लागतात.
अनिल देव म्हणाले, बँक दरवर्षी दिनदर्शिका प्रसिध्द करीत असते. वाईतील महागणपतीच्या मंदिरात हा कार्यक्रम होत असतो. परंतु बदलत्या परिस्थितीनुसार मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात येत आहे. आगामी वर्ष बँकेचे सभासद व ग्राहकांना आनंदाचे जावो, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. बँकेचे संचालक काशीनाथ शेलार यांनी प्रास्ताविक केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीपाद कुलकर्णी यांनी आभार मानले.
दिनदर्शिका प्रकाशन कार्यक्रमास बँकेचे उपाध्यक्ष डाँ. शेखर कांबळे, संचालक विवेक पटवर्धन, रमेश ओसवाल, मकरंद मुळ्ये, अशोक लोखंडे, प्रीतम भुतकर, संचालिका सौ. ज्योती गांधी, सरव्यवस्थापक चंद्रशेखर काळे, संतोष बागुल, सुहास पानसे, मल्हारी पेटकर आदी उपस्थित होते.