सातारा : शहराजवळील देगावफाटा परिसरातील समर्थनगरमधील डॉ. आपटे यांच्या दवाखान्याबाहेर आज दुपारी चारच्या सुमारास एका युवकाने गोळीबार केला. गोळीबार केल्याच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सातारा शहर पोलिसांनी सर्वत्र नाकाबंदी करत संशयितांचा शोध सुरु केला. शोधादरम्यान पोलिसांनी खेड (सातारा) भागातून गोळीबार करणाऱ्या संशयितास ताब्यात घेतले.
सातारा रहिमतपूर रोडवरील देगावफाटा परिसरात समर्थनगर आहे. येथे डॉ. आपटे यांचा दवाखाना आहे. दुपारी या दवाखान्यात महिला कार्यरत होती. चारच्या सुमारास एक युवक दवाखान्याजवळ दुचाकीवरुन आला. यावेळी त्याच्यासोबत दोन युवती होत्या. दुचाकी रस्त्यावर लावून दोन युवतींना बाहेर थांबवत तो दवाखान्यात आला.त्याने, अपघातात हाताला दुखापत झाली असून उपचार करायचे आहेत, डॉक्टर आहेत का, अशी विचारणा त्या महिलेकडे केली. त्यावर त्या महिलेने डॉक्टर पाच नंतर येतील अशी, माहिती त्या युवकास दिली. यानंतर तो युवक दवाखान्याबाहेर आला. त्याने सोबत असणाऱ्या दोन युवतींपैकी एकीकडून पिस्तुल घेत रस्त्यावर येवून गोळी झाडली.
गोळीच्या आवाजाने दवाखान्याील महिला बाहेर आली. तिने आवाजाचा कानोसा घेतला असता, डॉक्टरांची चौकशी करणारा युवक दोन युवतींसोबत त्याठिकाणी उभा असल्याचे दिसले. थोड्यावेळानंतर तो युवक दोन युवतींसमवेत एकाच दुचाकीवरुन निघून गेला. यानंतर त्या महिलेने याची माहिती डॉक्टरांना दिली. गोळीबाराची माहिती मिळाल्यानंतर सातारा शहर पोलिस अधिकारी, कर्मचारी त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी माहिती तपास सुरु केला. याचदरम्यान सातारा शहर आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोळीबार करणाऱ्या संशयित युवकास खेड येथून ताब्यात घेतले.