पुसेसावळी – पळशी (ता. खटाव) या गावातील बालक सोहम गणेश निंबाळकर हा शाळेत बसायचे नाही म्हणून रडायला लागल्याने वडिलांनी त्याला शाळेतून आणून घरी सोडले. मात्र, नंतर तो घरी न आल्याने मग सगळ्यांची भंबेरी उडाली. मात्र. ग्रामसुरक्षा यंत्रणच्या सहाय्याने त्याला तातडीने शोधण्यात यश आले.
तो दररोज शाळेत जावा म्हणून वडीलांनी त्याला समजावून सांगितले आणि कामानिमित्त ते घराबाहेर पडले. थोड्या वेळाने घरी येऊन बघितले तर मुलगा घरात दिसत नव्हता. ही बातमी कळताच कुटुंबीयांनी शेजारयाकडे खूप शोधाशोध करूनही तो सापडला नाही.
हे लक्षात येताच गावचे पोलीस पाटील सागर जाधव यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या हेल्पलाइन(18002703600) नंबरवरून ही माहिती तात्काळ आसपासच्या संपूर्ण गावाला व औंध पोलीस स्टेशनला कळवली.तात्काळ औंध पोलीस स्टेशनचे अधिकारी-अंमलदार व पळशी ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. त्या 5 वर्षांच्या चिमुकल्याची शोधमोहीम युद्धपातळीवर सुरू झाली. कुटुंबीयाच्या काळजाचे पाणी पाणी झाले होते. मनात वेगवेगळे विचार घर करून जात होते.
आसपासच्या परिसरामध्ये तरस-लांडग्याचा वावर असल्याने भीती जास्त बळावत चालली होती. सर्व गावकरी घराजवळ एकवटले आणि त्या चिमुकल्याचा शोध सुरू झाला आणि अखेर घरा शेजारील मक्याच्या शेतात सोहम निंबाळकर दडून बसलेला आढळून आला. मुलाला सुखरूप पाहून औंध पोलीस व मुलाचे आई-वडील,पळशी ग्रामस्थांचा जीव भांड्यात पडला.