विश्रांतवाडी – कल्याणीनगरमध्ये घडलेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी आम आदमी पक्षाने शास्त्रीनगर चौक ते येरवडा पोलीस स्टेशनपर्यंत मुक मोर्चा काढला. पोलीस स्टेशनपुढे ठिय्या आंदोलनही केले, त्यानंतर अपघातस्थळी जाऊन श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी येरवडा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी सदर गुन्हेगाराला कठोर शासन करण्याऐवजी पिझ्झा खायला देत त्याचे आदरातिथ्य केले. त्यामुळे प्रशासनाकडून झालेल्या तकलादू कार्यवाही व वडगांवशेरीचे आमदार सुनिल टिंगरे यांनी केलेल्या हस्तक्षेपाचा निषेध केला.
यावेळी महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके पाटील, प्रवक्ते मुकुंद किर्दत, पुणे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे, पुणे शहर युवाध्यक्ष अमित म्हस्के, संघटन मंत्री एकनाथ ढोले, प्रवक्ते किरण कद्रे, उपाध्यक्ष निलेश वांजळे, महासचिव अक्षय शिंदे, सतिष यादव, उपाध्यक्ष अनिल कोंढळकर, संघटन मंत्री मनोज शेट्टी, श्रद्धा शेट्टी, उपाध्यक्ष हारून मुलानी, रिक्षा आघाडी अध्यक्ष अनिल धुमाळ व कार्यकर्ते उपस्थित होते.
“पुण्यातील दोन आयटी इंजिनियर्सचा दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू म्हणजे भाजप सरकारचे अपशय आहे. गृहमंत्र्यांचा कुठलाही वचक पोलिस यंत्रणेवर नाही हे यावरून स्पष्ट होते. पुण्यातील वाढलेली गुंडगिरी, पब, रेस्टोबार ही संस्कृती भाजपच्या ढिलाइ धोरणामुळे वाढली आहे.” – सुदर्शन जगदाळे, पुणे शहराध्यक्ष, आम आदमी पक्ष
“बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाला वाचविण्यासाठी पोलीस प्रशासन, आमदार सुनील टिंगरे यांनी केलेली सारवासारव ही संशयास्पद आहे. वडगावशेरी मतदारसंघात यापूर्वी अनेक घटना घडल्या आहेत. त्यावेळी आमदार टिंगरे एवढ्या तत्परतेने उपस्थित राहिल्याचे आमच्या निदर्शनास नाही.” – अमित म्हस्के, युवा शहराध्यक्ष, पुणे शहर
“विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक शहर ही ओळख असलेले पुणे आता अवैध पबचे शहर बनत आहे. पुण्यातील दुर्घटनेतील बळी अतिशय धक्कादायक घटना आहे. पैश्यांच्या जोरावर आरोपींना वाचवण्यासाठी यंत्रणेने जी तत्परता दाखवली, ते वास्तव महाराष्ट्रासाठी, पुण्यासाठी घातक आहे.”- अजित फाटके पाटील, कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य