वाठार स्टेशन – सोळशी-केदारेश्वर मंदिर रस्त्यावर चवणेश्वर गावच्या हद्दीत धनकवडी (पुणे) येथील दाम्पत्यास 25 फेब्रुवारी रोजी दगडाचा धाक दाखवून मारहाण करत सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोबाइल, असा दोन लाख 51 हजार रुपयांचा ऐवज चोरणाऱ्या महेश उर्फ माक्या दत्तात्रय शिरतोडे (रा. मोती चौक, फलटण), विकास उर्फ लाल्या अनिल जाधव (रा. बावधन, ता. वाई) व हिमालय सतीश धायगुडे (रा. खेड बुद्रुक, ता. खंडाळा) यांना कोरेगावचे पोलीस उपअधीक्षक गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली वाठार स्टेशनचे सपोनि स्वप्निल घोंगडे व कर्मचाऱ्यांनी अटक केली आहे.
या गुन्ह्याच्या तपासात, जिल्हा पोलीस दलाच्या अभिलेखावरील सराईत गुन्हेगारांनी हा गुन्हा केल्याचे स्पष्ट झाले; परंतु संशयित पोलिसांना चकवा देत होते. यापैकी दोघे वाई परिसरात व एक जण लोणंद परिसरात असल्याची माहिती सपोनि घोंगडे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार करून संशयितांना मंगळवारी ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता, फलटण शहर व तालुक्यातही काही गुन्हे केल्याची कबुली त्यांनी दिली.
पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, स्वप्निल घोंगडे, पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील, सहाय्यक फौजदार धुमाळ, गुजर, भोसले, तानाजी चव्हाण, सचिन जगताप, दत्तात्रय पवार, अतुल कुंभार, राहुल मोरे, नितीन पवार, इम्रान मुलाणी, तुषार आडके, संदीप देखणे, श्रीकांत खरात, तुषार ढोकरे यांनी ही कारवाई केली.