आ. महेश शिंदे ; वाढदिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा
सातारा – प्राथमिक शिक्षकांच्या न्याय, हक्कासाठी सिध्देश्वर पुस्तके यांनी नेहमीच आवाज उठवला आहे. राज्यातील शिक्षकांना न्याय देणारे लढवय्ये व अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख आहे, असे प्रतिपादन आ. महेश शिंदे यांनी केले.
शिक्षकांचे नेते, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे कोषाध्यक्ष सिध्देश्वर पुस्तके यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात आ. शिंदे बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य योजना विभागाचे शिक्षण संचालक महेश पालकर, महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे नेते माधवराव पाटील, राज्याध्यक्ष केशवराव जाधव, अहमदनगर जिल्हा शिक्षक संघाचे नेते बापुराव तांबे, जिल्हा नेते सुरेश गायकवाड, अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे चेअरमन, राज्य संघाचे पदाधिकारी, जिल्हा शिक्षक संघाचे सर्व पदाधिकारी, बँकेचे आजी-माजी संचालक व सर्व तालुक्यातून आलेले शिक्षक संघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
महेश शिंदे म्हणाले, शिक्षक व संघटनेचे संस्कार माझ्या कुटुंबातच झाले असून माझ्या आईने संघटनेच्या माध्यमातून शिक्षक बँकेत संचालिका म्हणून काम केले असल्याने शिक्षक व संघटनेबद्दल मला विशेष आदर आहे. मी स्वतः पुस्तके यांना पहिल्यापासून संघटनेचे एक लढवय्ये व अभ्यासू नेते म्हणून पाहत आलो आहे. विद्यार्थ्यांना चांगले संस्कार करणे ही काळाची गरज आहे. स्पर्धेच्या युगात सक्षम करणे हे काम शिक्षकांनी मनापासून करावे हीच पुस्तके गुरुजींना वाढदिवसाच्या निमित्ताने गुरूदक्षिणा ठरेल असा आशावाद व्यक्त केला.
डॉ. महेश पालकर म्हणाले, मुले ही राष्ट्रीय संपत्ती असून देशाचा सुजाण नागरिक घडविण्याची जबाबदारी शिक्षक बांधवाची आहे. सिद्धेश्वर पुस्तके यांचा व माझा निकटचा संबंध असून खर्या अर्थाने ज्यांच्या नावात ईश्वर आहे. शिक्षकांच्या प्रश्नांची सोडवणूक संचालक म्हणून निश्चित करणार असून शासनाच्या शैक्षणिक विविध योजनांची अंमलबजावणी शिक्षकांनी प्रभावीपणे करावी, असे आवाहन केले.
सिद्धेश्वर पुस्तके म्हणाले, जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या ताकदीवर आजपर्यंत संघटनेत व शिक्षक बँकेत विशेष काम करता आले.
राज्य संघाचे नेते संभाजीराव थोरात यांनी परंपरागत प्रतिस्पर्धी असलेल्या शिक्षक समितीशी हातमिळवणी केली व सत्ता हस्तगत केली. पण या तत्वहीन युतीला घरघर लागली असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. आजपर्यंतच्या संघटनेच्या इतिहासात संघाचा पराभव विरोधकांमुळे झाला नसून स्वकीयांमुळे झाला आहे. मात्र, आगामी काळात बँकेत सत्ता मिळवणारच हा निर्धार आत्मविश्वासाने व्यक्त केला.
माधवराव पाटील म्हणाले, पुस्तके गुरुजी हे प्रभावी संघटक असून ते दमदार नेते आहेत. आगामी काळात शिक्षक बँकेत संघ सत्तेत दिसेल. केशवराव जाधव यांनी राज्य पातळीवरील शिक्षकांच्या प्रश्नांचा उहापोह करून राज्य संघाच्या वतीने पुस्तके गुरुजी यांना शुभेच्छा दिल्या. बापूसाहेब तांबे म्हणाले, पुस्तके गुरुजी हे माझे परममित्र असून भावी काळात आम्ही बरोबरीने राज्य संघ मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष महेंद्र जानुगडे व बँकेचे माजी चेअरमन राजेंद्र घोरपडे यांनी मनोगत व्यक्त केले. कोरेगाव तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष अरुण घोरपडे व त्यांच्या टीमने व महिला आघाडीने या दिमाखदार सोहळ्याचे आयोजन यशस्वीपणे केले होते.