दत्ताजीराव पाटील; राज्य सरकारविरोधात घेणार आक्रमक भूमिका
कोरेगाव – शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्यावतीने जिल्ह्यात उद्या, दि. 1 जानेवारी पासून जनसंपर्क अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानात शेतकर्यांच्या प्रश्नांवर चर्चा आणि राज्य सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेण्यात येईल, अशी माहिती माजी उपजिल्हाप्रमुख दत्ताजीराव बर्गे यांनी दिली.
याबाबतच्या प्रसिद्धीपत्रकात बर्गे यांनी म्हटले आहे की, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा लोकसभा मतदारसंघात उद्या, दि. 1 जानेवारीपासून जनसंपर्क अभियान सुरू केले जाणार आहे. दुष्काळाच्या झळा बसलेल्या शेतकर्यांच्या प्रश्नांवर थेट त्यांच्या बांधावर जाऊन चर्चा केली जाणार आहे. साखर कारखानदारांकडून ऊस उत्पादक शेतकर्यांची अडवणूक होत आहे.
खतांचे वाढते दर पाहता उसाला प्रतिटन किमान साडेतीन हजार रुपये दर देण्याची गरज आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. याचा पंचनामा या अभियानात केला जाणार आहे. कोरेगाव तालुक्याचा पूर्व भाग दुष्काळग्रस्त जाहीर करावा.
शेतकर्यांच्या दुधाला योग्य दर आणि कांद्याला हमीभाव द्यावा. शेती आणि जनावरे जगवण्यासाठी धोम धरणातून तातडीने पाणी सोडावे, या प्रमुख मागण्या आहेत. सध्या जिल्ह्यात दुष्काळाचे सावट असून, पाण्याची उपलब्धता कमी आहे. शेतकर्यांचे वीज बिल तात्काळ माफ करावे आणि शेतकर्यांच्या न्याय्य हक्कांसाठी ठाकरे गट आक्रमक भूमिका घेणार आहे.