सातारा – कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी म्हणजेच कार्तिकी एकादशीला देव निद्रित अवस्थेतून उठतात व पुन्हा जगाचा कारभार सांभाळतात अशी आख्यायिका आहे. आषाढी एकादशीला देवशयनी तर कार्तिकी एकादशीला प्रबोधिनी एकादशी असे संबोधले जाते. आज या एकादशीच्या मुहूर्तावर सातारा जिल्ह्यातील विविध विठ्ठल मंदिरात वैष्णव भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
सातारा शहरातील मंगळवार पेठेतील शाहू कला मंदिरा नजीकच्या श्री गवई परिवाराच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पहाटे काकड आरती होऊन महापूजा करण्यात आली. दिवसभर वैष्णव भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. विठ्ठल रुक्मिणीला विशेष अलंकार तसेच चांदीचे मुगुट घालण्यात आले होते. बुक्का, विविध सुवासिक फुले, तुळशीमाळा आणि सुवासिक फुलांचे हार यामुळे विठ्ठल रुक्मिणीचे गोजिरे रूप डोळ्यात साठवण्यासाठी सातारकर वैष्णव भक्तांनी रात्री उशिरापर्यंत गर्दी केली होती.
या मंदिरात सुरू असलेल्या नित्य काकड आरतीचा समारोप येत्या सोमवारी होणार आहे. एकादशीच्या मुहूर्तावर मंदिरास विशेष विद्युत रोषणाई करण्यात आली होती. दुपारी महिला मंडळाचे वतीने सांप्रदायिक भजन सादर करण्यात आले. सातारा शहरातील यादोगोपाळ पेठेतील घाटगे विठ्ठल मंदिरातही सध्या काकड आरती उत्सव तसेच कार्तिकी एकादशी निमित्त विठ्ठलाची विशेष महापूजा करून त्याला पगडी घालण्यात आली होती.
शहरातील खण आळी परिसरातील कासट परिवाराच्या श्री सत्यनारायण मंदिर, संगम माहुली येथील श्री राही-रुक्मिणी विठ्ठल मंदिर तसेच श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरातील राधाकृष्ण मंदिराच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. जावली तालुक्यातील प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या करहर-पाचगणी येथेही विठ्ठल मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. अनेक मंदिरांमधून खिचडी तसेच राजगिरा लाडूचा प्रसाद वितरित करण्यात आला.
विद्युत रोषणाईने उजळली मंदिरे
मंदिर परिसरात भक्तांसाठी तुळस, फुले ,बुक्का आदींची छोटी दुकाने थाटण्यात आली होती. “पुंडलिका वरदे हरी विठ्ठल..’ च्या गजरात तसेच विठ्ठल नामाच्या जयघोषाने दिवसभर मंदिर परिसरामध्ये लावण्यात आलेली सुमधुर अभंग, भजने व भावगीतांनी परिसर वेगळ्याच धार्मिक वातावरणात बदलून गेला होता. अनेक वैष्णव भक्तांनी कार्तिकी एकादशी निमित्त उपवास केला होता. त्यामुळे सातारा शहरातील भाजी मंडईतून रताळी, बटाटे, काकडी आधी उपवासाचे पदार्थ तसेच राजगिरा लाडू, बटाटा चिवडा, बटाटा शेव, वेफर्स, शेंगदाणा लाडू, साबुदाणा पदार्थांना मोठी मागणी दिसून येत होती.