मांढरदेव – संपूर्ण महाराष्ट्रात आजपासून शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला. संपूर्ण महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या काळूबाई देवीच्या मंदिरात देखील यानिमित्ताने घटस्थापना करण्यात आली.
सर्व ग्रामस्थ गावचे ग्रामदैवत भैरवनाथाच्या मंदिरात एकत्र येतात. तेथे शास्त्रोक्त, विधीवत पद्धतीने घटस्थापना केल्यानंतर सर्व ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने काळूबाई देवीच्या मंदिरात जातात. तेथे देखील ग्रामस्थ, पुजारी, उपस्थित भाविक आणि देवस्थान ट्रस्टमार्फत विधीवत पद्धतीनें घटस्थापना केली जाते. त्यानंतर देवीची महाआरती होऊन नवरात्रोत्सवास प्रारंभ होतो.
दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील देवीच्या गाभाऱ्याला देवस्थान ट्रस्टमार्फत फुलांची सजावट करण्यात आली असून, संपूर्ण मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे. नवरात्रोत्सवादरम्यान येथे होणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता, 61 पोलीस कर्मचारी, 40 महाराष्ट्र कमांडो फोर्सचे जवान, साफ-सफाई करण्यासाठी आळंदी येथील स्वकाम सेवा मंडळाची एक तुकडी रोज येवून जावून राहणार आहे.
त्यांच्या चहापाण्याची, जेवण्याची तसेच राहण्याची सोय देवस्थान ट्रस्टमार्फत करण्यात आली आहे, अशी माहिती देवस्थान ट्रस्टचे प्रभारी सचिव दादा कळंबे यांच्या मार्फत देण्यात आली. येणाऱ्या भाविकांसाठी देखील प्रसादाची तसेच फराळाची सोय ट्रस्ट मार्फत करण्यात आली आहे.
उत्सव सुरु, दुकाने बंद
आज नवरात्र उत्सवाच्या प्रारंभीच्या दिवशी मात्र मंदिराच्या उत्तर बाजूची दुकाने बंद होती. त्या सर्व दुकानांचे पुनर्वसन अजून मागे होणार असल्याचे संबंधीत दुकानदारांकडून सांगण्यात येत आहे.
++++++++++