ठोसेघर – राष्ट्रीय अपंग विकास महासंघ मुंबई, महाराष्ट्र राज्य शाखा-सातारा व स्वर्गीय क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने ठोसेघर, ता. सातारा येथील श्री काळभैरवनाथ मंदिर परिसर येथे सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरामध्ये बीपी, शुगर, नेत्र तपासणी, अस्थी तपासणी करण्यात आली. तसेच ताण तणाव व्यवस्थापन याबद्दल माहिती देण्यात आली. त्याच बरोबर दिव्यांगासाठी मोफत यु डी आय डी कार्डची नोंदणी करण्यात आली. त्याबरोबर किरकोळ आजारांसाठी गोळ्या व औषधे देण्यात आली.सदर शिबिराचा परिसरातील सुमारे दोनशेहून अधिक नागरिकांनी लाभ घेतला.
राष्ट्रीय अपंग विकास महासंघ ही संघटना दिव्यांगांच्या न्याय हक्कांसाठी, त्यांना सोयी सुविधा मिळवून देण्यासाठी व दिव्यांगांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील असते. या संघटनेत दिव्यांग तसेच समाज सेवेसाठी सुदृढ तरुणांनी मोठ्या संख्येने यावे असे आवाहन ठोसेघर पठार भागाचे नेते शंकरराव चव्हाण यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय अपंग विकास महासंघ शाखा साताराचे नूतन जिल्हाध्यक्ष सादिक अली बागवान व महिला आघाडी जिल्हाध्यक्ष अनिता धनवडे यांनी केले होते. त्यांना लक्ष्मण साळुंखे, हेमंत साळुंखे,प्रतीक धनवडे ,वैशाली दुबळे तसेच ग्रामपंचायत ठोसेघर, ठोसेघर हायस्कूल, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामस्थ, प्राथमिक व माध्यमिक शिक्षक ,अंगणवाडी सेविका तसेच आशा वर्कर्स यांनी सहकार्य केले.
उपसरपंच जयराम चव्हाण यांनी शिबिरातील नागरिकांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था केली होती. सातारा तालुका केमिस्ट संघटनेचे प्रवीण पाटील यांनी मोफत गोळ्या व औषधे यांचा पुरवठा केला. कार्यक्रमला सरपंच आनंदीबाई चव्हाण, महासंघाचे नूतन पश्चिम महाराष्ट्र राज्य संचालक तसेच सहसचिव नंदकुमार धनवडे, डॉ. माने, मुख्याध्यापक सतीश जाधव व सर्व शिक्षक, शिक्षकेतर स्टाफ,विविध पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.