सातारा: शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह राष्ट्रवादीच्या पॅनेलचे संकेत

जिल्हा बॅंक निवडणूक: उमेदवारीबाबतचा अंतिम निर्णय शरद पवार घेणार

सातारा – राष्ट्रवादी कॉंग्रेसने सातारा जिल्हा बॅकेच्या निवडणुकीसाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना सोबत घेऊन सर्वसमावेशक पॅनेल करण्याचा निर्णय पुण्यात आज झालेल्या बैठकीत घेतला आहे. तरीही उमेदवारांबाबतचा अंतिम निर्णय पक्षाध्यक्ष शरद पवार घेतील, असे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले.

विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत पुणे येथे झालेल्या बैठकीत सर्वसमावेशक पॅनेल आणि उमेदवार निवड निश्‍चिती या विषयावर चर्चा केली. मुंबईत महत्वाच्या बैठकांमुळे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मात्र या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत उमेदवार यादी अंतिम केली जाणार असल्याची माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली.
या बैठकीला सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील, आमदार शशिकांत शिंदे, विक्रमसिंह पाटणकर आणि भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले उपस्थित होते. आमदार शिवेंद्रसिह राजे भोसले यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पॅनेल उभे करण्याच्या विषयावर चर्चा झाली.

महाविकास आघाडीतील घटक पक्षांना संधी देण्यासंदर्भातही रामराजे यांनी आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा केली. घटक पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून समन्वयाने संधी देण्याची भूमिका रामराजे यांनी चर्चेदरम्यान मांडली. उमेदवारांचे सर्वसमावेशक पॅनेल आणि अंतिम यादी निश्‍चितीचा आढावा शरद पवार व अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यासाठी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वरिष्ठ केडरची पुन्हा महत्वपूर्ण बैठक होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

इच्छुक उमेदवार कोणकोणत्या मतदारसंघातून इच्छुक आहेत याची सविस्तर माहिती यावेळी रामराजे यांनी घेतली. या बैठकीत जास्तीत जास्त जागा बिनविरोध कशा होतील यावर राष्ट्रवादीच्या थिंक टॅकचा भर असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, एका जागेसाठी जिथे बहुसंख्य उमेदवार इच्छुक आहेत त्यांना कसे थांबवायचे या रणनीतीचा रामराजेंना निश्‍चितच विचार करावा लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. जळगावच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजपला नाकारले होते. त्या पार्श्‍वभूमीवर सातारा जिल्ह्यात भाजप आणि राष्ट्रवादीचा हा राजकीय घरोबा राज्याच्या राजकारणात मात्र चर्चेचा विषय ठरला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.