जिंकला मानाचा “स्ट्रॉंग वूमन ऑफ वर्ल्ड’ किताब
कलेढाण – उलान बतार (मंगोलिया) येथे झालेल्या जागतिक क्लासिक व इक्विप्ड पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत मूळ गाव कलेढोण असलेल्या पुण्याच्या डॉ. शर्वरी इनामदार यांनी जागतिक पातळीवर क्लासिक व इक्विप्ड असे दुहेरी सुवर्णपदक पटकावले. अशी कामगिरी करणाऱ्या डॉ. शर्वरी पॉवरलिफ्टिंग इंडियाच्या भारतातील पहिल्या खेळाडू ठरल्या आहेत.
या स्पर्धेत सुमारे 37 देशांचे एकूण 500 हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. डॉ. शर्वरी इनामदार यांनी 57 किलो महिला गटामध्ये 350 किलो वजन उचलले. क्लासिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धेमध्ये जपान, ग्रेट ब्रिटन, जर्मनी, हॉंगकॉंग, न्यूझीलंड, मंगोलिया, फिनलंड, यूएसए या देशांतील स्पर्धकांशी त्यांना कडवी झुंज द्यावी लागली. जेनिफर मेकॉंमबी (हॉंगकॉंग 340 किला ) रिबेका कर्कपॅट्रिक (ग्रेट ब्रिटन 342.5 किलो) यांना हरवून इनामदार यांनी जागतिक क्लासिक सुवर्णपदकावर आपले नाव कोरले!
इक्विप्ड पॉवरलिफ्टिंगमध्ये शर्वरी यांनी 395 किलो वजन उचलत पेरुच्या एलेना गुजमन (357.5 किलो) व मंगोलियाच्या ओयुनजर्गल (215 किलो) यांना पराभूत केले व भारतासाठी अजून एक जागतिक सुवर्णपदक खेचून आणले! एकूण पाच सुवर्णपदके व एक रजतपदक यांसह इक्विप्ड पॉवरलिफ्टिंगमध्ये मानाचा समजला जाणारा “बेस्ट लिफ्टर ऑफ वर्ल्ड’ म्हणजेच “स्ट्रॉंग वुमन ऑफ वर्ल्ड’ रनरअपचा किताबही डॉ. शर्वरी यांनी पटकावला.
जागतिक स्पर्धेमध्ये आपल्यासाठी दोन वेळा राष्ट्रगीत वाजल्यामुळे कष्टाचे सार्थक झाल्याची भावना शर्वरी यांनी व्यक्त केली. या स्पर्धेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे शर्वरी यांच्या आई डॉ. पूर्णा वसंत भारदे यांनी मास्टर थ्री (साठ वर्षापुढील गटामध्ये) क्लासिक प्रकारात चार ब्रॉंझ पदक व इक्विप्ड प्रकारात चार रजत पदकांची कमाई केली. राजम (आंध्रप्रदेश) येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेतून या मायलेकींची जागतिक स्पर्धेसाठी निवड झाली होती.
डॉ. वैभव इनामदार या दोघींचे प्रशिक्षक व मार्गदर्शक आहेत. येथील माजी सैनिकविनोद रघुनाथ इनामदार यांच्या सूनबाई डॉ. शर्वरी कलेढोणची शान आहेत! जागतिक स्पर्धेला जाण्यापूर्वी पालीचा खंडोबा आणि औंधची यमाईदेवी यांचे दर्शन घेतल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.