कराड – कराड शहराच्या वाढीव भागातील मुजावर कॉलनी (शांतीनगर) येथे बुधवारी सकाळी 7 च्या सुमारास भीषण स्फोट झाला. या स्फोटाने वाढीव भागातील मुजावर कॉलनी, खराडे कॉलनी, रेठरेकर कॉलनी, शिक्षक कॉलनीसह छत्रपती शिवाजी स्टेडियमचा परिसर हादरला. या स्फोटाची तीव्रता एवढी होती की, काही घरांची पडझड होऊन, चार दुचाकी वाहनांचे नुकसान झाले आहे. या घटनेत सात जण जखमी झाले आहेत.
दरम्यान, हा स्फोट कशामुळे झाला, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. या स्फोटाचे कारण तपासानंतर स्पष्ट होईल, असे अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. कराड पोलीस, पुण्याचे दहशतवादविरोधी पथक, फॉरेन्सिक लॅब, साताऱ्याचे बॉम्बशोधक व नाशक पथक, श्वानपथक तपास करत आहे. या स्फोटात शरीफ मुबारक मुल्ला (वय 36), सुलताना शरीफ मुल्ला (32), जोया शरीफ मुल्ला (10), राहत शरीफ मुल्ला (7), अशोक दिनकर पवार (54), सुनीता अशोक पवार (45), दत्तात्रय बंडू खिलारे (80, सर्व रा. शांतिनगर, मुजावर कॉलनी) हे जखमी झाले असून, त्यांना कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शांतिनगरातील मुजावर कॉलनीतील एका घरात बुधवारी सकाळी 7 च्या सुमारास भीषण स्फोट झाला. या स्फोटाच्या आवाजाने मुजावर कॉलनी, आजूबाजूच्या वसाहती आणि शिवाजी स्टेडियमचा परिसर हादरला. हा स्फोट झालेल्या घराची कॉंक्रिटची भिंत फुटून समोरच्या घरावर आदळली. स्फोट झालेल्या घरातील चार जण भाजून जखमी झाले असून, त्यात दोन लहान मुलांचा समावेश आहे. या घराशेजारी तीन महिन्यांपूर्वी बांधलेल्या इमारतीची भिंतही स्फोटामुळे कोसळली आहे. त्या खाली सापडलेले तीन जण जखमी झाले आहेत. स्फोट झालेल्या घरामागच्या मातीच्या घराची भिंत कोसळून स्वयंपाकघर उद्ध्वस्त झाले आहे. या घटनेत पाच घरांचे 20 लाख रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
शरीफ मुल्ला यांच्या घरात गॅसचे तीन सिलिंडर आणि शेगडी सुरक्षित आढळली आहे. त्यामुळे हा स्फोट गॅस सिलिंडरचा नसण्याची अधिक शक्यता असून, कराड पोलीस, पुण्याचे दहशतवादविरोधी पथक, न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे तज्ज्ञ, साताऱ्याचे बॉम्बशोधक व नाशपथक, श्वानपथक तपास करत आहे. अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी दुपारी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी तपासाबाबत महत्त्वाच्या सूचना पोलिसांना दिल्या. प्रथामिक तपासानुसार हा स्फोट गॅस गळतीमुळे झाला असावा. मात्र, त्याबाबत तांत्रिक अहवाल आल्यानंतर बोलता येईल, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, कराड तालुक्याचे पोलीस निरीक्षक विजय पाटील, पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी तळ ठोकून होते.