सातारा – भविष्य निर्वाह निधीचे खाते सातारा जिल्हा परिषद येथून सांगली जिल्हा परिषद येथे वर्ग करण्याचा आदेश काढण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षकाकडून तीन हजार रुपयांची लाच घेताना भविष्य निर्वाह निधी (माध्यमिक) पथकातील वरिष्ठ सहाय्यक हेमंत विठोबा हांगे (वय 35) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सातारा कार्यालयातील पथकाने बुधवारी पकडले.
याबाबत माहिती अशी, तक्रारदार एका कनिष्ठ महाविद्यालयात पर्यवेक्षकपदावर कार्यरत आहेत. त्यांचे सातारा जिल्हा परिषदेकडील भविष्य निर्वाह निधीचे खाते सांगली जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याचा आदेश काढण्यासाठी हेमंत हांगे याने तीन हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सातारा कार्यालयात तक्रार दिली होती.
या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर या विभागाचे पोलीस उपअधीक्षक राजेश वाघमारे यांच्या आदेशानुसार, पोलीस निरीक्षक सचिन राऊत, हवालदार गणेश ताटे, तुषार भोसले, नीलेश येवले यांनी जिल्हा परिषदेच्या इमारतीतील भविष्य निर्वाह निधीच्या कार्यालय परिसरात सापळा रचून हांगे याला लाचेची रक्कम स्वीकारताना पकडले. त्याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या प्रकरणी हांगे याची अधिक चौकशी करण्यात येत आहे.