पाथर्डी – लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या विकी भगवान हिंगे हा युवक हॉस्पिटलमध्ये रात्रपाळीचे कंपाउंडरचे काम करून दिवसा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत पोलीस सेवेत दाखल झाला आहे. देवाच्या आशीर्वादाने हे यश मिळाले असून, यशपूर्ती म्हणून त्याने नोकरीतील पहिले पाच पगार तालुक्यातील व शहरातील देवस्थानाला देणगी म्हणून दिले.
तालुक्यातील मुंगूसवाडे येथील विकी भगवान हिंगे पोलिस भरती झाला. देवाच्या कृपाशीर्वादाने आपण पोलिस झालो, म्हणून त्याने पहिले पाच पगार तालुक्यातील श्रद्धास्थान असलेल्या मोहटा देवी, शहरातील तपनेश्वर, हॉस्पिटलजवळील गणपती मंदिर, क्रांती चौकातील शनी मंदिर, पोळा मारुती मंदिर अशा श्रद्धास्थानांवर जाऊन देणगी दिली. श्रद्धा असलेल्या या ठिकाणाहून सकारात्मक ऊर्जा मिळाली आणि यशाची प्राप्ती झाली. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत 200 उमेदवारांतून फक्त दोघांची पोलिस म्हणून निवड झाली. त्यापैकी एक विकी होता. सध्या हिंगे याचे मुंबई येथे प्रशिक्षण सुरू आहे.
तालुक्याच्या पूर्व भागातील सुमारे 35 किलोमीटर अंतरावर मुंगूसवाडे गाव सततचे दुष्काळी म्हणून परिचित आहे. संपूर्ण परिसर ऊसतोडणी कामगारांचा व दुर्गम असल्याने मूलभूत सुविधांचा अभाव. गावात हिंगे यांचे माध्यमिक शिक्षण झाले. दहावीनंतरच्या शिक्षणाला पाथर्डीशिवाय पर्याय नव्हता.पाथर्डीला आल्यावर विकी हिंगे याने वयाच्या 18व्या वर्षापासून एका खासही हॉस्पिटलमध्ये गेल्या सात वर्षांपासून रात्रपाळीचे कंपाउंडर म्हणून काम केले.
अनाथ असलेल्या विकीने प्रतिकूल परिस्थितीमध्ये हॉस्पिटलमध्येच रात्रपाळी करत राहण्याचे साधन शोधले. तेथील आलेल्या पैशातून जेवणासाठी लावलेल्या मेसचे पैसे खर्च होत. त्याच प्रमाणे स्पर्धा परीक्षांच्या केंद्रात जाऊन दिवसा अभ्यास करत. त्याचीही असणारी फी विकी हिंगे हा स्वतःच्या कमाईतून देत असे. प्राथमिक वेतन म्हणून सुमारे 30 हजार रुपये महिना विकी यांना मिळतो. श्रद्धास्थानांपैकी सर्वच मंदिरात त्याने एक-एक पगार दान दिला आहे. हिंगे यांना डॉ. अभय भंडारी, बाबूजी आव्हाड महाविद्यालयाचे अध्यक्ष अभय आव्हाड यांचे मार्गदर्शन लाभले. डॉ. भंडारी, रमण लाहोटी, महेश बाहेती, गजानन भंडारी, आनंद बनसोड, संतोष उदबत्ते, बाळू ढुमणे, सुभाष उदबत्ते यांनी हिंगे यांचे अभिनंदन केले.