सातारा – जिल्ह्यात कोविड लसीकरणाची तयारी पूर्ण झाली असून नऊ केंद्रांवर तीन टप्प्यांमध्ये ही मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेला शनिवार, दि. 16 पासून सुरुवात होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी विनय गौडा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये उपस्थित होते. सिंह म्हणाले, या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात शासकीय व खासगी आरोग्य संस्थांमधील कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात पोलीस, सैन्यदल, हवाई दल कर्मचारी व तिसऱ्या टप्प्यात सामान्य नागरिकांना लस देण्यात येणार आहे. जिल्ह्यासाठी तीस हजार लसी उपलब्ध झाल्या आहेत. पहिल्या टप्प्यात 24 हजार 410 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाईल.
लसीकरणाच्या तयारीसाठी जिल्हा स्तरावर तीन बैठका घेण्यात आल्या. तालुकास्तरावर विभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समित्या स्थापन करून बैठका घेण्यात आल्या. तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, तालुका पर्यवेक्षक, आरोग्य सहाय्यकांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लसीकरणाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. लसीकरणाच्या ड्राय रन, म्हणजे रंगीत तालमीमध्ये 75 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. लसीकरण मोहिमेच्या ठिकाणी तीन खोल्या तयार करण्यात आल्या आहेत.
तेथे सामाजिक अंतर, मास्क व सॅनिटायझरचा वापर बंधनकारक असेल. लसीकरणाच्या ठिकाणी प्रतीक्षालय उभारले असून यादीतील लाभार्थ्यांना त्यात प्रवेश दिला जाईल. लसीकरणाच्या खोलीत तज्ज्ञ आरोग्य अधिकाऱ्यांकडून लस टोचली जाईल. लस टोचलेल्या लाभार्थ्यांना निरीक्षण खोलीमध्ये तीस मिनिटे ठेवण्यात येईल. जिल्ह्यात क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय, कराड व फलटण उपजिल्हा रुग्णालये, पाटण, कोरेगाव, माण, खंडाळा ग्रामीण रुग्णालये, कराडचे कृष्णा मेडिकल कॉलेज व वाईतील मिशन हॉस्पिटल या ठिकाणी लसीकरण करण्यात येणार आहे.
त्रिसूत्री सोडायची नाही :
लसीकरण झाल्यानंतर त्या व्यक्तीला पुन्हा करोना होणार नाही, असे म्हणणे सध्या तरी धाडसाचे ठरेल. त्यामुळे लसीकरणानंतरही सामाजिक अंतर, मास्क व सॅनिटायझरचा वापर, वेळोवेळी हात धुणे, ही त्रिसूत्री सोडायची नाही, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.