कराड तालुक्यातील तीन व कोरेगाव मधील एक रूग्णांचा समावेश
सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यात रविवारी चार जणांचे करोना रिपोर्ट पाँझिटिव्ह आले असून जिल्ह्यातील रुग्णांची संख्या १३३ झाली आहे. रविवारच्या चार रुग्णापैकी तिघे कराड तालुक्यातील तर एक जण चंचळी (ता. कोरेगाव) येथील आहे.
सातारच्या क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात गुजरातमधून प्रवास करुन आलेला एक युवक व कराडच्या वेणूताई चव्हाण उप जिल्हा रुग्णालयातील एक रुग्ण जो करोनाबाधित रुग्णाचा निकट सहवासात होता तसेच कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल असणाऱ्या करोनाबाधित रुग्णाच्या निकट सहवासातील दोन असे एकूण चार जण करोनाबाधित असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
सध्या क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात २४, कराडच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये १० व कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये ३० असे एकूण ६४ करोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. यापैकी ६२ रुग्ण लक्षणे विरहित किंवा सौम्य लक्षणे असलेली असून उर्वरित दोन रुग्णास मध्यम स्वरुपाची लक्षणे आहेत.
सातारच्या क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील २ आणि फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील ५, कृष्णा मेडिकल कॉलेजमधील १८ अशा २५ संशयित रुग्णांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले.
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात रविवारी २४ (प्रवास करुन आलेले २३, श्वसनसंस्थेच्या तीव्र जंतूसंसर्गाचे १) नागरिकांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असून या २४ नागरिकांचे व करोनाबाधित २ रुग्णांच्या १४ दिवसानंतरचे घशातील स्त्रावांचे नमुने एन. सी. सी. एस.पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत करोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- १३३ झाली असून या पैकी ६५ जण उपचार घेत आहेत. ६६ जण करोनामुक्त होवून घरी गेलेले आहेत. तर दोन करोनाबाधितांचा मृत्यु झाला आहे.