सातारा – उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक माजी आमदार आनंदराव पाटील यांच्यात शासकीय विश्रामगृहात सुमारे एक तास बंद दाराआड खलबते झाली. या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून आगामी काळात नवीन राजकीय समीकरणे होण्याची शक्यता आहे.
अजित पवार सुमारे चार तास शासकीय विश्रामगृहात असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकाऱयांनी मोठी गर्दी केली होती. रविवारी दुपारी अजित पवार यांचे शासकीय विश्रामगृहात अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव, तहसीलदार राजेश जाधव, उपअभियंता प्रशांत खैरमोडे यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अमित कदम, जावळीचे अध्यक्ष साधू चिकणे आदी उपस्थित होते.
प्रारंभी अजित पवार यांनी भेटीसाठी आलेल्या नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या तात्काळ सोडवण्याचा प्रयत्न केला. याचदरम्यान आ. दीपक चव्हाण, आ. मकरंद पाटील, माजी आमदार आनंदराव पाटील, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन बाळासाहेब सोळसकर यांचे आगमन झाले. आनंदराव पाटील यांच्यासमवेत अजित पवारांनी सुमारे एक तास बंद दाराआड चर्चा केली. या चर्चेचा तपशील समजू शकला नसला तरी अजित पवार व आनंदराव पाटील यांच्यात वाढलेली जवळीक बरेच काही सांगून जात आहे. त्यामुळे आगामी काळात अनेक राजकीय समीकरणे घडण्याची शक्यता आहे.
दीपक पवार आले आणि परतले
शासकीय विश्रामगृहात अजित पवार असताना याठिकाणी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते दीपक पवार यांचे अचानक शासकीय विश्रामगृहावर आगमन झाले. सुमारे दहा ते पंधरा मिनिटे ते त्यांच्या वाहनात बसून होते. यादरम्यान त्यांनी उपस्थित पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. दीपक पवार विश्रामगृहात येऊन अजित पवार यांच्याशी चर्चा करतील असे वाटत असतानाच अचानक दीपक पवार शासकीय विश्रामगृह परिसरातून निघून गेले. या घडामोडीची जोरदार चर्चा परिसरात सुरु होती.