मराठा आरक्षण ; महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडून कामाला वेग
पुणे – मराठा समाजाच्या आरक्षणासाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडून सर्वेक्षण सुरु आहे. मागील सहा दिवसांत पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागात मिळून एकूण 9 लाख 2 हजार कुटुंबांचे सर्वेक्षण झाले आहे. हे सर्वेक्षण दि.31 जानेवारी 2024 पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.
जिल्ह्यात या सर्वेक्षणाचे काम दि.23 जानेवारी 2024 पासून सुरु करण्यात आले आहेत. पुणे मनपा हद्दीत 2 हजार प्रगणक आणि ग्रामीण भागात 6 हजार 500 प्रगणकांमार्फत (कर्मचारी) हे सर्वेक्षण केले जात आहे. सर्वेक्षणासाठी प्रश्नावली तयार करण्यात आली असून यामध्ये 180 प्रश्नांच्या आधारे हे सर्वेक्षण केले जात आहे. या सर्वेक्षणासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी हे नोडल अधिकारी तर मनपा हद्दीत मनपा आयुक्त हे नोडल अधिकारी आहे. तर तालुका स्तरावर तहसिलदार यांना नोडल अधिकारी म्हणून नेमले आहे.
तांत्रिक समस्या दूर…
पहिले दिवशी सर्वेक्षणासाठी करण्यात आलेल्या संगणक प्रणालीमध्ये तांत्रिक समस्या निर्माण झाली होती. ती समस्या आता दूर झाली असून सर्वेक्षणास गती मिळाली आहे. रविवारी (दि.28) सायंकाळी सहा वाजेपर्यंत ग्रामीण भागात एकूण 3 लाख 50 हजार 885 कुटुंबांचे सर्वेक्षण झाले. तर पुणे शहरात 3 लाख 26 हजार 972 कुटुंबांचे तर पिंपरी-चिंचवड शहरात 2 लाख 25 हजार 53 कुटुंबांचे सर्वेक्षण झाले आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.