पुणे – पावसाच्या हलक्या सरींमुळे शहरातील हवेत रात्रीच्यावेळी गारवा वाढला होता.मात्र, मागील 24 तासात कमाल तापमानासह किमान तापमानातही वाढ झाल्यामुळे रात्रीचा गारवा कमी झाला आहे. शहरातील कमाल तापमान 33.4 तर किमान तापमान 22.3 अंश सेल्सिअस इतके आहे. मागील दोन दिवसात 19 ते 20 अंशापर्यंत खाली गेलेल्या किमान तापमानात दोन अंशाने वाढ झाल्यामुळे शहरातील उकाडा वाढलेला आहे.
आज दिवसभर ऊन आणि दुपारनंतर ढगाळ वातावरण होते. तर पुढील दोन दिवस शहरातील कमाल तापमानात आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे. आकाश निरभ्र राहील, तर कमाल तापमान 34 ते 35 अंशाच्या आसपास राहील.
विदर्भ, मराठवाड्यातील तापमानतही घट
मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात झालेल्या पावसामुळे कमाल तापमानात दोन ते तीन अंशाने घट झाली. त्यामुळे तापलेल्या विदर्भ आणि मराठवाड्यातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. आज दिवसभरात मुंबईतील सांताक्रुझ परिसरात सर्वाधिक 36.3 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. राज्यातही कोकण-गोव्यातील काही भागात पाऊस तर विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील हवामान कोरडे राहील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.