Entertainment : बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान आणि अनन्या पांडे या दोघींनी देखील कमी कालावधीत आपल्या अभिनयाने सिनेइंस्ट्रीत मोठे यश संपादन केले आहे. काही दिवसांपूर्वी या दोघींनी दिग्दर्शक करण जोहरच्या कॉफी विथ करण’ या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी दोघींनी आपल्या कामासह वैयक्तिक आयुष्याबाबत मोठे खुलासे केले. यामुळे त्या चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. यानंतर आता सारा आणि अनन्या दोघीही लवकरच नव्या चित्रपटात एकत्र झळकणार आहे.
अनन्या आणि सारा कॉकटेल 2 मध्ये दिसणार आहेत. पहिल्यांदाच या दोघी एकत्र चित्रपटात काम करताना दिसणार आहे. अनन्या पांडे आणि सारा अली खान या दोघी खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. अनेकदा त्या कार्यक्रमांना, पार्टीला एकत्र हजर राहिल्या आहेत. पण आता त्यांची ही मैत्री प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर पाहता येणार आहे. अनन्या आणि साराला मैडॉक फिल्म्सच्या ऑफिसबाहेर स्पॉट करण्यात आलं आहे. त्यामुळे त्या दोघी ‘कॉकटेल 2’चा भाग असणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
कॉकटेलबद्दल बोलायचे झाले तर हा चित्रपट 2012 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात सैफ अली खान, दीपिका पदुकोण आणि डायना पेंटी मुख्य भूमिकेत दिसले होते. डायना पेंटीने कॉकटेलमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. याशिवाय डिंपल कपाडिया आणि रणदीप हुड्डा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. दीपिका पादुकोण आणि सैफ अली खानचा हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला.
दरम्यान, अक्षय कुमार आणि जॉन अब्राहमच्या देसी बॉईजचाही सिक्वेल बनणार आहे. त्याच्या सिक्वेलमध्ये अक्षय आणि जॉनऐवजी टायगर श्रॉफ आणि वरुण धवनची जोडी दिसणार आहे. त्याच्यासोबत अनन्या पांडेलाही या चित्रपटासाठी फायनल करण्यात आले आहे. मात्र, या चित्रपटातील कलाकारांबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.