हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार संतोष बांगर नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने वादात अडकत असतात. त्यातच त्यांचा एक नवा व्हिडीओ समोर आला असून यात ते त्यांच्या जिल्ह्यातील विद्यार्थिनींच्या तक्रारी ऐकत असतं बस आगारप्रमुखांना शिवराळ भाषेत शिव्या देताना दिसत आहेत. त्याच्या या कृतीमुळे ते पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हिंगोली जिल्ह्यातील दुधाळा, डिग्रस, पिंपरी, बोराजा या गावातील विद्यार्थिनींना घरी जाण्यासाठी वेळेवर बस मिळत नव्हती. तसेच एसटी कंडक्टर देखील विद्यार्थिनींशी उद्धट भाषेत बोलत असल्याने या विद्यार्थिनींनी थेट आमदार संतोष बांगर यांचे कार्यालय गाठले. यावेळी विद्यार्थिनींनी आमदार संतोष बांगर यांच्याजवळ त्यांची व्यथा मांडत एसटी कंडक्टरची देखील तक्रार केली. संतोष बांगर यांनी देखील या विद्यार्थिनींचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर त्यांनी तात्काळ आगारप्रमुखांना त्यांच्या कार्यालयात बोलावून घेतले.
आमदार संतोष बांगर यांची आगारप्रमुखांना ताकीद देताना मात्र जीभ पुन्हा एकदा घसरली. संतोष बांगर यांनी शिवीगाळ करत आगारप्रमुखांना दम दिला. यावेळी त्यांनी कंडक्टरवरही कठोर कारवाई करण्यास आगारप्रमुखांना सांगितले. जर पुन्हा माझ्याकडे अशी तक्रार आली तर अशा कंडक्टरला मी लोळेपर्यंत पायाखाली तुडवेन अशा शब्दांत संतोष बांगर यांनी ताकीद दिली आहे. संतोष बांगर यांच्या अशा शब्दप्रयोगांमुळे एका लोकप्रतिनिधीला अशी भाषा शोभत नसल्याचे म्हटले जात जात आहेत.
पुढे बोलताना त्यांनी, ‘मी जितका चांगला आहे तितकाच वाईट आहे असे म्हणत बांगरांनी या विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांना घरी जाण्यासाठी योग्य बससेवा पुरवण्यात यावी अस्व आगारप्रमुखांना सांगितले आहे. तसेच या मुलांच्या बसमध्ये एखादी महिला कंडक्टर किंवा एखादा वयस्कर कंडक्टर देण्यास त्यांनी यावेळी आगरप्रमुखांना सांगितलं आहे. ही मुलं जर पुन्हा तक्रार घेऊन आली तर मी माझ्या भाषेत उत्तर देईन असे देखील बांगरांनी म्हटले आहे.