पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीमध्ये 25 पेक्षा जास्त विद्यमान नगरसेवकांना घरी बसण्याची वेळ आली आहे. या सर्व उमेदवारांच्या जागी महिलांचे आरक्षण पडल्यामुळे या नगरसेवकांचा हिरमोड झाला आहे. तर अनेक गावकी-भावकीतील इच्छुक आमने-सामने येणार असल्यामुळे निवडणुकीत चांगलीच रंगत येण्याची शक्यता आहे. यामध्ये प्रामुख्याने पिंपळे गुरव, वाकड, चिंचवडगाव, चिखली, काळेवाडी, भोसरी गावठाणमधील अनेक विद्यमान पुरूष नगरसेवकांना महिला आरक्षणाचा जबर फटका बसला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 2022 या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार मंगळवारी (दि.31) रोजी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात महिला आरक्षण सोडत काढण्यात आली. पारदर्शक काचेच्या डॅममध्ये एका रंगाच्या चिठ्या टाकून शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते सोडत काढण्यात आली. सुरूवातीला अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी आरक्षण सोडतीची पध्दत सांगितली.
याप्रसंगी महापालिका आयुक्त राजेश पाटील, उल्हास जगताप, निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर, विठ्ठल जोशी, अण्णा बोदडे आदी अधिकारी उपस्थित होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समितीच्या माजी सभापती सिमा सावळे, सारंग कामतेकर, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, अरूण पवार यांच्यासह आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
139 जागांपैकी 70 जागा महिलांसाठी, अनुसूचित जातीसाठी 22, अनुसूचित जमातीसाठी 3 जागा आरक्षित आहेत. तर 114 जागा या सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुल्या आहेत. एकूण 25 प्रभागात दोन महिला उमेदवार येणार असल्यामुळे अनेक विद्यमान नगरसेवकांना फटका बसला आहे. सर्वसाधारण महिलांसाठी 57 जागा आहेत. त्यातील 45 जागा थेट पद्धतीने राखीव झाल्या आहेत. प्रभाग क्रमांक 46 मध्ये थेटपद्धतीने एक जागा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव केली. त्यामुळे 12 प्रभागासाठी सोडत काढण्यात आली. यामध्ये सर्वसाधारण महिलेसाठी 40, 12, 36, 7, 21, 13, 1, 42, 8, 31, 27, 30 हे प्रभाग राखीव झाले.
येथील लढती होणार रंजक
चिंचवडगाव प्रभागात सर्वसाधरण गटात एक पुरूष असल्याने दोन विद्यमान नगरसेवकांना फटका बसला आहे. पिंपळे सौदागरमधील सागर आंघोळकर आणि अंबरनाथ कांबळे यांच्यापैकी एकाला घरी बसावे लागणार आहे. पिंपळे गुरवमधील प्रभाग 46 मध्ये एक पुरूष, एक एससी, दोन महिलांचे आरक्षण पडले आहे. यामुळे स्थायी समितीचे माजी सभापती अतुल शितोळे, प्रशांत शितोळे, विद्यमान नगरसेवक हर्षल ढोरे यांची अडचण झाली.
हे पुन्हा एकदा आमने-सामने येण्याची शक्यता आहे. तसेच भोसरी गावठाणामध्ये दोन महिलांचे आरक्षण पडल्याने संतोष लोंढे आणि दोन स्थायी समितीचे सभापती समोरा-समोर येणार आहे. चिखलीमध्येही दोन विद्यमान नगरसेवकांपैकी एकाला घरात बसावे लागणार आहे. काळेवाडीत दोन महिलांचे आरक्षण पडल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान नगरसेवक विनोद नढे, संतोष कोकणे तर वाकडमधून राहुल कलाटे, मयूर कलाटे या बंधूंची अडचण झाली आहे. पिंपळे गुरवमधील आरक्षणांमुळे येथील इच्छुक आता नवी सांगवी येथे येऊन निवडणूक लढविण्याच्या शक्यता वाढल्या आहेत.