Sanjay Shirsat on Eknath Khadse : राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे स्वगृही भाजपात परतणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. ते एक-दोन दिवसांतच पुन्हा भाजपात सहभागी होतील. खडसे यांच्या भाजप प्रवेशावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शिरसाट म्हणाले, “केवळ आपला पक्षच आपला असतो, याची जाणीव एकनाथ खडसे यांना झाली असेल, त्यामुळे ते पुन्हा भारतीय जनता पक्षात येत असतील. एकनाथ खडसे जर महायुती सोबत परत आले तर त्यामुळे कोणत्याच पक्षातील कोणीही नाराज होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. झाला तर एकनाथ खडसे यांच्यामुळे महायुतीला फायदाच होईल.”
आठ दिवसात असे अनेक धक्के बसतील –
संजय निरुपम यांच्या पक्ष प्रवेशाबाबत शिरसाट म्हणाले, संजय निरुपम यांच्या पक्ष प्रवेशाची एक ते दोन दिवसातच घोषणा होण्याची शक्यता आहे. निरूपम जर शिवसेनेमध्ये येत असतील तर त्यांची मागणी काय असेल? हे त्यांनी अद्याप स्पष्ट केलेले नाही. तसेच शिवसेना पक्ष म्हणून त्यांना काय दिले जाईल, हे देखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे या संदर्भात योग्य वेळी सर्व माहिती समोर येईल.
संजय निरुपम यांच्याबरोबर उद्धव ठाकरे गटातील अनेक आमदार आणि महाआघाडीचे अनेक नेते आमच्या संपर्कात असल्याचा दावा देखील संजय शिरसाट यांनी केला. पुढील आठ दिवसात एकानंतर एक असे अनेक धक्के महाविकास आघाडीला बसणार आहे, असे देखील संजय शिरसाट यांनी म्हटले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची आज बैठक घेतली. या बैठकीनंतर संजय शिरसाट यांनी माध्यमंशी संवाद साधला. एकनाथ खडसे, संजय निरुपम यांच्यावरील वक्तव्यासोबत त्यांनी लोकसभा जागावाटपावरही प्रतिक्रिया दिली. शिरसाट म्हणाले, मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत महायुतीच्या जागा वाटपात नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि कोकणातील जागा शिवसेनेलाच मिळाली पाहिजे, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जागा वाटपाबाबत चर्चा करत असून लवकरच सकारात्मक तोडगा काढला जाईल, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.