पुणे – मेव्हण्याला गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणात भाजपचे माजी खासदार संजय दत्तात्रय काकडे (वय 52) आणि त्यांच्या पत्नी उषा (वय 44, दोघेही, रा. यशवंत घाडगेनगर, रेंजहिल्स रस्ता) यांना चतृ:शृंगी पोलिसांनी अटक केली. दरम्यान, या दाम्पत्याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी 15 हजार रुपयांच्या जामिनावर त्यांची मुक्तता झाली.
याबाबत मेहुणे युवराज ढमाले (वय 40) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीकडून ऍड. विजयसिंह ठोंबरे यांनी काम पाहिले. फिर्यादी हे बांधकाम व्यावसायिक आहेत. संजय काकडे आणि फिर्यादी यांच्यामध्ये सुरुवातीला भागीदारीत व्यवसाय होता.
मात्र, त्यांच्यात मतभेद निर्माण झाल्यामुळे 2010 पासून दोघेही स्वतंत्र्य व्यवसाय करतात. ऑगस्ट 2018 मध्ये फिर्यादी संजय काकडे यांच्या घरी गेले असता, त्यावेळी “तुला संपवायला वेळ लागणार नाही, तू पैशाचा माज येऊ देऊ नकोस, तुला आणि तुझ्या कुटुंबाला सुपारी देऊन संपवेल’, अशा शब्दांत संजय काकडे यांनी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
चतृ:शृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे यांनी गुरुवारी सकाळी काकडे दाम्पत्याला अटक करून पोलीस बंदोबस्तात न्यायालयात हजर केले.