चित्रकूट/ नवी दिल्ली – मुस्लीम बहूल भागांमध्ये शाखा सुरू करण्याबरोबरच प. बंगालचे विभाजन तीन विभागात करून तेथे संघटनेचा विस्तार करण्याचे धोरण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रांत प्रचारकांच्या बैठकीत ठरवण्यात आला. 2024 च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
चित्रकूटमध्ये पाच दिवसांपासून सुरु असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रांत प्रचारकांच्या बैठकीचा आज समारोप झाला. या शिबिरामध्ये राजकीय विचारमंथनही झाले.
पश्चिम बंगालमध्ये संघटनेची पाळेमुळे मजबूत करण्यासाठी त्या राज्याची तीन खंडांमध्ये कामासाठी विभागणी करुन कार्य वाढवण्यात येणार आहे. पश्चिम बंगालमधील मुख्य कार्यालय कोलकातामध्ये असेल, मध्य बंगालमधील कारभार वर्धमानमधून पाहिला जाईल, राज्यातील उत्तरेकडील भागामधील संघाचे काम सिलीगुडीमधून हाताळले जाईल.
संघाने आता मुस्लीम बहुल भागामध्ये शाखा सुरु करण्याचा निर्णयही बैठकीत सरसंघचालक मोहन भागवत यांनी जाहीर केल्याचे वृत्त न्यूज 18 लोकमत या वृत्तवाहिनीने दिले आहे.
करोना साथीच्या काळात बंद पडलेल्या संघाच्या सायंकालीन आणि प्रभात शाखाही पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. केवळ मोठ्या आणि लहान शहरांमध्ये असलेला संघाचा प्रभाव आता ग्रामीण भागात पोहोचवण्याची योजना आखण्यात आली आहे.
अरुण कुमार भाजपासाठी समन्वयक
दक्षिण बंगालमधील प्रांत प्रचारक जलधर महतो यांना सहक्षेत्र प्रचारक ही जबाबदारीही देण्यात आलीय. प्रांतप्रचारक प्रशांत भट्ट यांना दक्षिण बंगालमधील प्रांत प्रचारक करण्यात आले. पूर्वेकडील ओडिसा आणि बंगालच्या प्रांतामधील सह क्षेत्र प्रचारक रामापदो पाल यांच्यावरही नवीन जबाबदारी सोपवण्यात आली.
क्षेत्र प्रचारक प्रदीप जोशींना अखिल भारतीय सह संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचे मुख्य कार्यालय चंढीगडमध्ये असेल. त्याचप्रमाणे आता भैय्याजी जोशींना संघ आणि विश्व हिंदू परिषदे दरम्यानचे संयोजक असतील. डॉक्टर कृष्ण गोपाल यांनान विद्या भारतीचे प्रमुख संपर्क अधिकारी बनवले असून सर कार्यवाहक अरुण कुमार यांना संघ आणि भाजपामध्ये समन्वय ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.