ब्रुसेल्स – ऑगस्ट महिन्यात बेलारुसमध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणूकांदरम्यान झालेल्या निदर्शनांदरम्यान बळाचा वापर केल्यावरून युरोपिय संघाने आज बेलारुसचे अध्यक्ष आणि अन्य 14 अधिकाऱ्यांवर निर्बंध घातले. बेलारुसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकशेंको यांच्यासह त्यांचे पुत्र आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार विक्टर लुकशेंको यांच्यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत.
या निर्बंधांतर्गत युरोपियन संघाच्या सदस्य देशंमध्ये प्रवास करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांची मालमत्ताही गोठवण्यात येणार आहे. युरोपियन संघातील नागरिक आणि कंपन्यांही त्यांना निधी उपलब्ध करून देऊ शकणार नाहीत.
बेलारुसमध्ये 9 ऑगस्टला झालेल्या निवडणूकांमध्ये 80 टक्के मते मिळून लुकशेंको यांची अध्यक्षपदी फेरनिवड झाल्याचे निकाल जाहीर झाले होते. त्यानंतर लगेचच आंदोलनाला सुरुवात झाली होती. देशभरातील 15 हजार आंदोलकांना अटक करण्यात आली होती. निवडणूकांमध्ये गैरप्रकार झाल्याचे उघडपणे दिसत असल्याचे निरीक्षणही युरोपिय संघाने व्यक्त केले आहे.
या निवडणूकीतील विरोधी उमेदवारांना एकतर्फीपणे अपात्र ठरवले गेले. अनिर्बंधपणे अटकसत्र राबवले गेले आणि शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर हिंसक कारवाईही केली गेली.तसेच पत्रकारांनही धमकावले गेले. अध्यक्ष लुकशेंको हे अध्यक्षीय निवडणूकीत आणि त्यानंतर झालेल्या हिंसाचाराला जबाबदार आहेत, असेही निर्बंधांमध्ये म्हटले आहे.
लुकशेंको, त्यांचे सहकारी मिळून बेलारुसमधील 59 अधिकाऱ्यांवर युरोपिय संघाचे निर्बंध लागू आहेत. या निर्बंधांबाबतचे वृत्त समजताच सुमारे 200 अपंग व्यक्तींनी गुरुवारी राजधानी मिन्स्कमध्ये लुकशेंको यांच्या विरोधात निदर्शने केली.