नवी दिल्ली : तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांचे पुत्र आणि राज्याचे युवक कल्याण आणि क्रीडा विकास मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी केलेल्या एका वक्तव्याने राजकीय गोंधळ निर्माण झाला आहे. त्यांनी सनातन धर्माबाबत वक्तव्य केल्यानंतर भाजप नेत्यांसह अनेक लोक त्यांचा निषेध करत आहेत. उदयनिधी यांनी, ‘सनातन धर्म हा डेंग्यू आणि मलेरियासारखाच’ असल्याचे म्हटले आहे. त्यासोबतच त्यांनी हा धर्म आपल्या सगळ्यांना मिळून संपवायचा असल्याचे धक्कादायक वक्तव्य केले आहे.
उदयनिधी यांनी शनिवारी सनातन निर्मूलन परिषदेत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘सनातन धर्म हा सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात आहे. काही गोष्टींना विरोध करता येत नाही, त्या रद्द केल्या पाहिजेत. आम्ही डेंग्यू, डास, मलेरिया किंवा कोरोनाला विरोध करू शकत नाही. ते पुसून टाकायचे आहे. तसेच सनातनलाही नष्ट करायचे आहे. उदयनिधी स्टॅलिन यांच्या सनातन धर्मावरील वक्तव्यानंतर गदारोळ सुरू झाला आहे. उदयनिधी स्टॅलिन यांनी बोलताना, “सनातनला केवळ विरोध करू नये. त्यापेक्षा ते रद्द केले पाहिजे.
तामिळनाडूतील सत्ताधारी द्रमुक सरकारमधील युवक कल्याण आणि क्रीडा विकास मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी पुढे बोलताना, ‘सनातन हे संस्कृत नाव आहे. हे सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात आहे.’ असे म्हटले आहे.
दरम्यान, उदयनीधी यांच्या वक्तव्यावर भाजपकडून टीका करण्यात येत आहे. भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी उदयनिधी यांच्या वक्तव्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘उदयनिधी स्टॅलिन यांनी देशातील 80 टक्के लोकसंख्येचा नरसंहार’ करण्याचे आवाहन केले आहे.
अमित मालवीय यांच्या आक्षेपानंतर उदयनिधी स्टॅलिन यांनी त्यांना प्रत्युत्तर देत सनातन धर्माच्या अनुयायांना संपवण्याचे आवाहन आपण कधीही पुकारला नाही, असे म्हटले आहे. त्यासोबतच ‘मी सनातन धर्मामुळे त्रस्त असलेल्या उपेक्षित समाजाच्या वतीने बोलत आहे.’ म्हणत उदयनिधी यांनी आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे म्हटले आहे.