नवी दिल्ली – वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत भाजपसोबत हातमिळवणी केली. यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तर उद्धव ठाकरे गटाला “धगधगती मशाल’ हे चिन्ह दिले. परंतु या चिन्हावर सुद्धा समता पक्षाकडून दावा करण्यात आला आहे. याबाबतच्या याचिकेवरील सुनावणी आता 6 आठवड्यांनी निश्चित करण्यात आली आहे.
आज पार पडलेल्या सुनावणीत समता पक्षाकडे मशाल चिन्हावर दावा करणारी पुरेशी कागदपत्रे नसल्याने आता ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. मशाल चिन्हाच्या या याचिकेवर 6 आठवड्यांनी सुनावणी करण्यात येणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे. यामुळे समता पक्षासह ठाकरे गटाला मशाल चिन्ह नेमके कोणाचे यासाठी वाट पाहावी लागणार आहे.
दरम्यान, या महिन्यात 31 तारखेला ठाकरे गटाकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर देखील सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगासमोर शिंदे गटाकडून आणि सोबतच ठाकरे गटाकडून धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना पक्षाच्या नावावर दावा करण्यात आला होता.
यावर याआधी जी सुनावणी करण्यात आली त्यानुसार पक्षाचे नाव आणि चिन्ह दोन्हीही शिंदेंना देण्यात आले. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर त्या विरोधात ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.