गुवाहाटी – करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत आरोग्य यंत्रणेसह नातेही हतबल झालेले पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी मुलांनी आपल्या वडिलांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासही निकार दिला. तर काही आई-वडिल आपल्या करोनाबाधित मुलाला रुग्णालयात सोडून फरार झालेले आपण ऐकलं. त्यात सूनेकडून सासू-सासऱ्यांना फारशी चांगली वागणूक मिळत नाही, असा गैरसमज समाजात पसरला आहे. मात्र गुवाहाटीमधील एका सूनेनं हा गैरसमज दूर केला आहे.
गुवाहाटीतील सूनबाईने करोनाबाधित आपल्या सासऱ्याला वाचविण्यासाठी केलेली धडपड चर्चेत आली आहे. ७५ वर्षीय सासऱ्याला रुग्णालयात नेण्यासाठी वाहन मिळालं नाही. मात्र सुनेने खचून न जाता सासऱ्याला आपल्या पाठीवर घेऊन रुग्णालय गाठलं. या सूनेबाईंचं नाव आहे निहारिका, तर सासऱ्यांचं नाव आहे थुलेश्वर. निहारिका यांचे पती सुरज कामासाठी घरापासून दूर आहे. पतीच्या गैरहजेरीत सूनबाईंनी मुलाचं कर्तव्य देखील पार पाडलं.
करोनाबाधित रुग्ण म्हटलं की, सगळेच दूर पळतात. सोशल डिस्टन्सिंग पाळलं नाही, करोना होण्याची शक्यता वाढते. मात्र सूनबाई निहारिका यांनी धोका पत्कारून सासऱ्यांना रुग्णालयात दाखलं केलं. आता निहारिका यांना देखील करोनाची लागण झाली आहे.
निहारिका आता आयसोलेशनमध्ये आहेत. तर त्यांच्या सासऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र सासऱ्यांना सोडून आपण दुसरीकडे राहणार नाही, असं म्हटल्यावर डॉक्टरांनी दोघांना भोगेश्वरी फुकानानी रुग्णालयात पाठविण्याची व्यवस्था करून दिली.