मुंबई – सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटातील सलमान खानचा कॅमिओ सीन चांगलाच गाजला होता. थोडा वेळेसाठी, पण जेव्हा दोन्ही स्टार पडद्यावर एकत्र दिसले तेव्हा थिएटरमधे टाळ्या शिट्ट्या घुमल्या. आता पुन्हा एकदा ‘टायगर 3’ या चित्रपटात प्रेक्षकांना हे दोन स्टार एकत्र पाहायला मिळणार आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार 8 मे रोजी सलमान-शाहरुख या चित्रपटाच्या स्पेशल सीक्वेन्सचे शूटिंग करत आहेत. यासाठी निर्माते पाण्यासारखे पैसेही ओतत आहेत.सलमान खानच्या ‘टायगर 3’मधला त्याचा आणि शाहरुख खानचा हा स्पेशल सिक्वेन्स हा चित्रपटाचा महत्वाचा भाग असणार आहे. यामुळेच या सीनसाठी ते मोठ्या प्रमाणावर तयारी करत आहेत आणि त्यासाठी बजेटही जोरदार ठेवण्यात आल्याचे समजते.
प्रेक्षकांना या सीनमध्ये शाहरुख आणि सलमान खानची अॅक्शन पाहायला मिळणार आहे. आदित्य चोप्रा यासाठी जवळपास 35 कोटी रुपये खर्च करत असल्याचं बोललं जात आहे. शाहरुख आणि सलमान खान जेव्हा एकाच फ्रेममध्ये असतात तेव्हा प्रेक्षकांसाठीही हा एक चांगला अनुभव असतो. ‘पठाण’मध्येही असेच काहीसे घडले होते आणि चित्रपट सुपरहिट ठरला होता.
‘टायगर 3’ हा यशराज फिल्म्स स्पाय युनिव्हर्सचा पाचवा भाग आहे. यंदाच्या दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.या चित्रपटाचे दिग्दर्शन मनीष शर्मा करत आहेत. चित्रपटात कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. मल्टीस्टारर आणि बिग बजेट अशा टायगर सिनेमाची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.