पाच महिन्यांत 42 लाख सायकलींची विक्री

लॉकडाऊनमुळे लोक घेत आहेत सायकलचा आधार

जयपूर – लॉकडाऊनमुळे संसर्ग टाळण्यासाठी व सुरक्षित प्रवास करण्यासाठी लोक सायकल विकत घेत असल्याचे आढळून येत आहे. गेल्या पाच महिन्यांत सायकलची विक्री दुप्पट वाढली आहे.
अचानक मागणी वाढल्यामुळे सायकल उत्पादक व वितरकांची तारांबळ उडाली आहे.

पहिल्यांदाच बऱ्याच ग्राहकांनी मागणी नोंदवूनही त्यांच्या पसंतीची सायकल न मिळाल्यामुळे त्यांना वाट पाहावी लागली. अखिल भारतीय सायकल उत्पादक संघटनेने जारी केलेल्या माहितीनुसार मे ते सप्टेंबर या काळात 42 लाख सायकलची विक्री झाली.

या संघटनेचे महासंचालक के. बी. ठाकूर यांनी सांगितले की, इतिहासात प्रथमच सायकलची मागणी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मे महिन्यात 4 लाख 56 हजार सायकली विकल्या गेल्या. जून महिन्यामध्ये 8 लाख 51 हजार तर सप्टेंबर महिन्यात 11 लाख 21 हजार सायकली विकल्या गेल्याचे त्यांनी सांगितले.

सायकलमुळे एकतर सोशल डिस्टन्सिंग पाळून प्रवास करता येतो. त्याचबरोबर इंधनाचा खर्च लागत नाही. त्यामुळे कमी अंतरावरील प्रवासासाठी लोक सायकलचा वापर करीत आहेत.सायकल चालविल्यानंतर व्यायाम होतो याची जाणीव नागरिकांना होत आहे.

उत्पादनापेक्षा मागणी जास्त…

बऱ्याच सायकलींना मागणी जास्त आहे. मात्र, त्या प्रमाणात उत्पादन होत नाही. त्यामुळे वितरकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे ज्या सायकलच्या किमती दहा हजार रुपयांपेक्षा जास्त आहेत अशा सायकलींना सध्या मागणी वाढली आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी वितरक व उत्पादक समन्वयाने प्रयत्न करीत असल्याचे दिसून येते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.